
सरसंघचालक, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
चंद्रपूर, 3 नोव्हेंबर (हिं.स.) राज्याच्या अर्थमंत्री पदावर असताना चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला वेगळा आयाम देणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन साकारलेल्या कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती या लोकार्पण सोहळ्याला लाभणार आहे.
अर्थमंत्री, वनमंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आ. मुनगंटीवार यांनी कार्यशील दृष्टिकोन आणि विकासनिष्ठ सेवाव्रत यांच्या बळावर चंद्रपूर जिल्ह्यात मोठया प्रमाणावर विकासकामे पूर्णत्वास आणली. “विकास हा धर्म” आणि “समाजहित हे ध्येय” या धोरणातुन त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त केला. या वाटचालीत चंद्रपूरच्या जनतेसाठी एक महत्त्वपूर्ण लोककल्याणकारी प्रकल्प प्रत्यक्षात उतरत आहे, तो म्हणजे 280 कोटी रु. किंमतीचे टाटा ट्रस्ट च्या सहकार्याने साकारलेले चंद्रपूर कॅन्सर रुग्णालय.
2014 मध्ये अर्थमंत्री झाल्या पासून आ. मुनगंटीवार यांनी या विषयाचा जोरदार पाठपुरावा केला. दिनांक 17 एप्रिल 2018 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चंद्रपूर येथे अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. दि. 26 जून 2018 रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला. जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान, राज्य शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने 280 कोटी रुपये खर्चातून उभारण्यात आलेले अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल आज पूर्णत्वास आले आहे. पूर्वविदर्भातील आदिवासी, ग्रामीण आणि सर्वसामान्य घटकांसाठी हे केंद्र खऱ्या अर्थाने नवजीवनाचा आधार आणि आशेचा किरण ठरणार आहे.
या कॅन्सर हॉस्पिटलची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.तळमजला + ४ मजले, अंदाजे १,००,०००+ चौ.फुट क्षेत्रफळ, १४० बेड क्षमतेचे अत्याधुनिक उपचार केंद्र, कॅन्सर निदान व उपचारासाठी सुसज्ज तंत्रसामग्री : यात सीटी सिम्युलेटर (CT-S), मॅमोग्राफी, 3D/4D अल्ट्रासाऊंड, 3D/4D आणि इलास्टोग्राफीसह उसग, सीटी – १६ स्लाइस आणि स्पेक्ट, २ रेषीय प्रवेगक (Linear Accelerators),ब्रेकीथेरपी, डिजिटल एक्स-रे, विशेष उपचार विभाग :यात केमोथेरपी, सर्जिकल ऑन्कोलॉजी, आधुनिक प्रयोगशाळा : सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology), रक्तविज्ञान (Haematology), हिस्टोपॅथोलॉजी आदींचा समावेश आहे. या सर्व बाबींमुळे हे रुग्णालय पूर्वविदर्भातील सर्वात सक्षम, सुसज्ज आणि पूर्णत्वाने Cancer Care देणारे केंद्र ठरणार आहे.
या प्रकल्पाबाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांची टाटा समूहाचे प्रमुख दिवंगत रतन टाटा यांच्याशी चर्चा होत असताना त्यांनी या रुग्णालयाचे लोकार्पण सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. आ. मुनगंटीवार यांनी मोहन भागवत यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली असता त्यांनी 22 डिसेंबर रोजी या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्यास मान्यता दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव