
रायगड, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी न्याय मिळावा, या मागणीसाठी राज्यभरात डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी रविवारी कॅन्डल मार्च काढला. अलिबागमध्येही रायगड जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी व डॉक्टरांच्या वतीने जिल्हा रुग्णालय ते बालाजी नाका या मार्गावर शांततेत कॅन्डल मार्च काढण्यात आला.
डॉ. संपदा मुंडे या सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांचा मृतदेह हॉटेलमध्ये आढळून आल्याने राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे. डॉक्टर समुदाय न्याय मिळावा, तपास पारदर्शक व निष्पक्ष व्हावा, अशी मागणी सातत्याने करत आहे.
या कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थी सहभागी झाले. त्यांच्या हातात मेणबत्त्या व न्याय मिळवून देण्याच्या मागण्यांचे फलक होते. “डाॅ. संपदाला न्याय मिळालाच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. या वेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मार्टच्या अध्यक्षा डॉ. अलका मुंडे म्हणाल्या की, “डाॅ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात तपासाला राजकीय वळण दिले जात आहे. प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) द्यावा आणि न्यायालयात जलदगतीने सुनावणी व्हावी,” अशी मागणी करण्यात आली.
त्या पुढे म्हणाल्या, “राज्यातील शासकीय डॉक्टरांना मानसिक ताण, कामाच्या वाढत्या जबाबदाऱ्या आणि सेवेत येणाऱ्या अडचणींवरही सरकारने गंभीरतेने विचार करावा. डॉ. संपदा मुंडे यांच्यासारखी वेळ इतर कोणत्याही डॉक्टरवर येऊ नये,” असेही त्यांनी नमूद केले. या शांततामय कॅन्डल मार्चमधून डॉक्टरांनी “न्यायासाठी एकजूट” असा संदेश दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके