
धुळे, 3 नोव्हेंबर (हिं.स.) - सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी जोहर (छत्तीसगड) पार्टीचे अध्यक्ष अमित बघेल यांचा निषेध करण्यात आला. जिल्ह्यातील संपूर्ण सिंधी समाज, पूज्य सिंधी जनरल पंचायत ट्रस्ट, भारतीय सिंदु युवा मंच यांच्यावतीने जिल्हाधिकार्यांना लेखी निवेदन दिले बघेल यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,की २६ ऑक्टोबर २०२५ रोजी रायपूर (छत्तीसगड) येथे आयोजित पंचशताब्दी संवाद कार्यक्रमात अमित बघेल यांनी सिंधी समाजाचे आराध्य देवता भगवान झूलेलाल (वरुणावतार) यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केले. हे वक्तव्य समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याने संपूर्ण सिंधी समाजात तीव्र संताप निर्माण झाला आहे.
अमित बघेल यांनी जाणूनबुजून धार्मिक भावना दुखावून समाजात सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत माहिती म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री यांनाही पाठविण्यात आली आहे. या प्रसंगी पूज्य सिंधी जनरल पंचायत ट्रस्टचे अध्यक्ष गुलशन उदासी, सचिव दुरुकुमार लखवाणी, सदस्य गुरु कुमार लच्छनानी तसेच सिंधी समाजातील प्रमुख उपस्थित होते. त्यांनी समाजाच्या भावनांचा आदर राखून अशा वक्तव्यांविरुद्ध तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर