
रत्नागिरी, 3 नोव्हेंबर, (हिं. स.) : येथील रोटरी क्लबतर्फे मत्स्य अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांना शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल टीचर्स एक्सलन्स अॅवॉर्डने गौरविण्यात आले.
रोटरी क्लब गेली ६८ वर्षे रत्नागिरीत सामाजिक, शैक्षणिक आणि लोकसेवेचे विविध उपक्रम राबवत आहे. क्लबकडून दरवर्षी टीचर्स एक्सलन्स अॅवॉर्ड किंवा नेशन बिल्डर अॅवॉर्ड प्रदान केले जातात. यावर्षीचा पुरस्कार सोहळा हॉटेल विवेक येथे पार पडला.
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१७० चे प्रांतपाल डॉ. लेनी डिकोस्टा यांच्या हस्ते डॉ. केतन चौधरी यांना शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. चौधरी गेल्या ३० वर्षांपासून मत्स्य अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जाते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी होते. सचिव श्री. वीरकर, वरिष्ठ दिलीप भाटकर आणि धरमसी चौहान यावेळी उपस्थिते होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी