
नवी मुंबई, 2 नोव्हेंबर (हिं.स.) भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. शेवटपर्यंत श्वास रोखून धरायला लावलेल्या या सामन्यात अखेर भारतीय संघाने बाजी मारली. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला. दिप्ती शर्मा आणि शफाली वर्माने या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
87 धावा आणि 2 विकेट्स घेत शफाली खऱ्या अर्थाने भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली. प्रतिका रावल दुखापतग्रस्त झाल्याने शफालीला सेमी फायनल आणि फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. आणि तिनं या संधीचं सोनं केलं. तर दिप्ती शर्मानेही फलंदाजी आणि गोलंदाजीत कमाल केली. तिने 58 धावांची संयमी खेळी आणि 4 महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या. भारताकडून या विश्वचषकात तिनेच सर्वाधिक विकेट्स घेण्यची किमया साधली आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉर वॉलवीर्डने झुंजार 101 धावांची इनिंग खेळत आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण ती दक्षिण आफ्रिकेला विजय साकारुन देऊ शकली नाही. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं. शफाली वर्मा आणि दिप्ती शर्माच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 7 विकेट्स गमावून 298 धावांपर्यंत मजल मारली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे