पाकिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण करण्यात भारताचा हात, ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
इस्लामाबाद, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरील तणाव आता लपून राहिलेला नाही. मात्र नेहमीप्रमाणे याही वेळेस पाकिस्तान स्वतःच्या कृत्यांचे दोष भारतावर टाकत आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी असा दावा केला आहे क
पाकिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण करण्यात भारताचा हात - पाक संरक्षण मंत्री


इस्लामाबाद, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरील तणाव आता लपून राहिलेला नाही. मात्र नेहमीप्रमाणे याही वेळेस पाकिस्तान स्वतःच्या कृत्यांचे दोष भारतावर टाकत आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी असा दावा केला आहे की नवी दिल्ली पाकिस्तानविरुद्ध कट रचत आहे.

ख्वाजा आसिफ यांच्या मते, भारत पाकिस्तानला पूर्व आणि पश्चिम दोन्ही आघाड्यांवर गुंतवून ठेवू इच्छितो. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यान असलेल्या दुरंड रेषेवरील तणाव हे त्याचाच एक भाग आहे.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले,“जर पुराव्यांची गरज भासली, तर आमच्याकडे पुरावे आहेत की पाकिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण करण्यात भारताचा हात आहे. भारत पूर्व आणि पश्चिम दोन्ही सीमेवर पाकिस्तानला अडकवून ठेवू पाहत आहे.” तथापि, त्यांनी आपल्या दाव्यांना समर्थन देणारे कोणतेही ठोस पुरावे सादर केले नाहीत.

ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यान शस्त्रसंधी घडवून आणण्यासाठी कतार आणि तुर्कीया यांच्या मध्यस्थीचे समर्थन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार “अफगाणिस्तानच्या प्रश्नाचे लवकरात लवकर निराकरण करणे आवश्यक आहे. अफगाण भूमीवर वाढत चाललेला दहशतवाद नष्ट करणे गरजेचे आहे.”

ख्वाजा आसिफ यांनी पुढे असा आरोप केला की, “भारताने तालिबानला चुकीच्या दिशेने नेले आहे आणि पाकिस्तानविरुद्ध भडकवले आहे. काबुलमध्ये बसलेले लोक नवी दिल्लीच्या कठपुतळ्यांसारखे वागत आहेत.”

पाकिस्तानने दहशतवादाचा हवाला देत काबुलवर हवाई हल्ला केला होता. त्याच्या प्रत्युत्तरात अफगाण सेनेनेही पाकिस्तानी सैनिकांवर हल्ला केला.दरम्यान, ९ ऑक्टोबर रोजी काबुलमध्ये झालेल्या स्फोटांनंतर हिंसा भडकली, ज्यात ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगाण सरकारने या हल्ल्याच्या मागे इस्लामाबादचा हात असल्याचा आरोप केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande