
जळगाव, 3 नोव्हेंबर (हिं.स.) | जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसाचे संकट असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात आगामी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. दोन दिवस मध्यम पावसाची शक्यता असून यांनतर थंडीचं आगमन होईल.
अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यात ही अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली होती. अवकाळीमुळे वेचणीवर आलेल्या कापसासह मका, सोयाबीन व इतर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोवर आता मागच्या काही दिवसापासून होत असलेल्या अवकाळीमुळे मोठ्या संकटात सापडला आहे.
दरम्यान अवकाळी पाऊस हजेरी लावत असताना जिल्ह्याच्या हवामानाने एक विचित्र वळण घेतले आहे. जिल्ह्यात अक्षरशः विषुववृत्तीय प्रदेशासारखी स्थिती निर्माण झाली असून, दुपारच्या वेळेस कडक ऊन्हाचा चटका जाणवतो, तर रात्री आणि सकाळच्या वेळेस दमदार पाऊस हजेरी लावत आहे. काल रविवार देखील पहाटपासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. या काळात कमाल तापमान २९-३३ अंश आणि किमान तापमान १८ ते २३ अंशांवर राहील, तर हवेतील आर्द्रता ४०-५५ टक्के पर्यंत असेल. दोन दिवसानंतर मात्र पावसाची स्थिती कमी होऊन, जिल्ह्यात कोरडे वातावरण निर्माण होईल आणि थंडीचे आगमन होण्यास सुरुवात होईल. जळगावचे कमाल तापमान ३२ अंश तर किमान तापमान २३ अंश नोंदवले गेले.
अवकाळी पाऊस होत असला तरी उकाडा मात्र जाणवत आहे. जळगावकर आता थंडीच्या आगमनाची वाट पाहत आहे. अशातच ६ नोव्हेंबरपासून थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. थंडी वाढून किमान तापमान १३ ते १७ अंशांपर्यंत खाली येईल. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र कमकुवत झाल्याने आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे थंड हवा दक्षिणेकडे सरकत असल्याने थंडीच्या वाढीस गती मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच गुलाबी थंडीला सुरुवात झाली होती. गतवर्षी २ नोव्हेंबर रोजी किमान तापमान १८ अंशांवर होते. त्यामुळे गुलाबी थंडीचा अनुभव नागरिकांना आला होता. यंदा किमान तापमान २३.२ अंशांवर आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर