
धुळे , 3 नोव्हेंबर (हिं.स.) | शिंदखेडा तालुक्यातील धमाणे शिवारात ३ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे ६ गावांतील शेतकर्यांना आता दिवसा वीजपुरवठा होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनाफ राबविण्यात येत आहे. ही योजना शेतकर्यांसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करते. यावेळी दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती जिजाबराव सोनवणे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सयास सोपानराव दराडे, कार्यकारी अभियंता भाऊसाहेब पाटील, शिंदखेडा नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष अनिल वानखेडे, उपकार्यकारी अभियंता अभिजीत अहिरे आदी उपस्थित होते.
रावल म्हणाले की, शेतकर्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्वकांक्षी योजना आणली आहे. या योजनेचा शेतर्यांना लाभ होत आहे. आता शिंदखेडा तालुक्यातील धमाने येथे ३ केव्ही चा सोलर प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या कार्यान्वयनानंतर बाम्हणे कक्षा अंतर्गत रात्री दिला जाणारा शेती वाहिनीचा वीजपुरवठा आता दिवसा उपलब्ध होणार आहे. या योजनेचा लाभ बाम्हणे, धमाणे, चिलाणे, कुरुकवाडे, रहिमपूर आणि विखुरले या सहा गावांतील शेतकर्यांना होणार असून शेतकर्यांना दिवसा सातत्यपूर्ण व स्थिर वीजपुरवठा मिळेल.
यामुळे शेतीसाठीची सिंचन व्यवस्था अधिक सुलभ होणार असून, उत्पादन क्षमतेत वाढ होऊन शेतकर्यांचा वेळ आणि श्रम वाचणार असल्याचे पालकमंत्री रावल यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता भाऊसाहेब पाटील यांनी प्रकल्पाची वैशिष्ट्रये आणि क्षेत्रातील लाभ याबाबत माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर