
परभणी, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। शिक्षणमहर्षी स्व. शेषराव धोंडजी भरोसे यांच्या सोळाव्या स्मृतिदिनानिमित्त भरोसे परिवाराच्या वतीने शहरातील वसमत रोडवरील संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणात आज सोमवारी 3 नोव्हेंबर रोजी हभप नामदेव महाराज लबडे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी हभप नामदेव महाराज म्हणाले की, कुठल्याही क्षेत्रात त्यागाला महत्त्व आहे; त्यागाशिवाय शांती नाही, आणि शांती शिवाय सुख नाही. संतज्ञानाद्वारे शांती मिळते. त्याग हे साधनात्मक आहे, तर शांती ही आध्यात्मिक आहे. समाज आज बहिरंग होत चालला आहे, त्यामुळे साधुसंत समाजात जन्म घेऊ शकत नाहीत. म्हणूनच संतांच्या विचारांचा दिवा हातात घेऊन प्रकाशाचा शोध घ्या. परमार्थात कधीही तडजोड करू नका. हर्ष आणि शोक यांचा त्याग केल्यावरच निंदा-स्तुतीचा परिणाम होत नाही, असे ते म्हणाले. संत ज्ञानेश्वरांच्या अवताररूपात असलेले रंगनाथ महाराज गुरुजी हे आत्मज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारे होते. स्वतःला जपा, निर्व्यसनी रहा आणि संतसंगती ठेवा. संस्कार आणि चांगले विचार देणार्या आई-वडिलांची सेवा स्वतःचा श्वास असेपर्यंत करा, असे भावनिक आवाहन नामदेव महाराजांनी कीर्तनातून केले. शिक्षणमहर्षी स्व. शेषराव धोंडजी भरोसे आबांच्या असीम कार्याचे स्मरण करत, त्यांनी दिलेला आदर्श, संस्कार आणि समाजकारणाचा वारसा नेटाने पुढे नेण्याचा आणि जीवनभर त्यासाठी झटण्याचा संकल्प आम्ही दृढ केला आहे, असे हभप नामदेव महाराज लबडे यांनी म्हटले.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis