
पुणे, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।राज्यात कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, या उद्देशाने राज्य शासनाने कुष्ठरोगाला नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार २०२७ पर्यंत कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र बनविण्यासाठी निदान झालेल्या कुष्ठरोग रुग्णांची नोंद दोन आठवड्यांच्या आत संबंधित जिल्हा आरोग्य कार्यालय, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, कुष्ठरोग, तसेच स्थानिक नागरी आरोग्य अधिकाऱ्यांकडे करणे आता सर्व डॉक्टर आणि आरोग्य संस्थांसाठी बंधनकारक आहे. सप्टेंबर २०२५ अखेर राज्यात ७ हजार ८६३ नव्या कुष्ठरुग्णांची नोंद झाली आहे, तर उपचाराखालील रुग्णांची संख्या १३ हजार १० इतकी आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना कुष्ठरोग निदान व नोंदणीसंबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. राज्य शासनाने सन २०२७ पर्यंतकुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र हे उद्दिष्ट ठेवले आहे.त्यामध्ये संसर्गाची साखळी पूर्णपणे तोडणे, प्रसार शून्यावर आणणे, मुलांमधील विकृतीचे प्रमाण शून्य करणे आणि कुष्ठरुग्णांविषयी समाजातील भेदभाव नष्ट करणे या बाबींचा समावेश आहे. कुष्ठरोग नियंत्रणासाठी सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील सर्व डॉक्टर, पॅथॉलॉजिस्ट, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, आरोग्य कर्मचारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी निदान झालेल्या सर्व रुग्णांचा योग्य उपचार, पाठपुरावा, तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस (पीईपी) देणे आवश्यक आहे.राज्यातील नागरिकांनी कुष्ठरोगाबाबत भीती बाळगू नये. हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, फक्त वेळेत निदान आणि उपचार आवश्यक आहे. त्यामुळे लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु