
मुंबई, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय स्मार्टफोन निर्माता लावा कंपनीनं आपल्या टॉप-ऑफ-द-लाइन अग्नी सिरीजमधील नवीनतम स्मार्टफोन ‘लावा अग्नी 4’ ची अधिकृत घोषणा केली आहे. हा फोन 20 नोव्हेंबर रोजी भारतात लॉंच होणार असून, त्यात मेटल फ्रेम, पिल-आकाराचा कॅमेरा मॉड्यूल आणि ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. मागील वर्षीच्या अग्नी 3 मध्ये दिलेला सेकंडरी डिस्प्ले यावेळी नसेल, मात्र ड्युअल स्पीकर आणि फ्लॅट डिस्प्लेची सुविधा मिळणार आहे. कंपनीनं या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी सिरीजचा चिपसेट वापरला जाईल, असं स्पष्ट केलं आहे, पण नेमका मॉडेल क्रमांक अद्याप उघड केलेला नाही.
लीक्सनुसार, लावा अग्नी 4 मध्ये 6.67 इंचाचा 1.5के ओएलईडी डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ असेल. प्रोसेसर म्हणून मीडियाटेक डायमेंसिटी 8350 वापरला जाऊ शकतो, जो वनप्लस नॉर्ड सीई 5 आणि इन्फिनिक्स जीटी 30 प्रो सारख्या फोनमध्येही आढळतो. स्टोरेजसाठी यूएफएस 4.0 तंत्रज्ञानाची सुविधा मिळू शकते, ज्यामुळं हा फोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये प्रीमियम अनुभव देईल.
कॅमेराच्या बाबतीत ड्युअल सेटअप देण्यात आला असून, यात 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स असण्याची शक्यता आहे. सॉफ्टवेअर विभागात ब्लोटवेअर-फ्री, जवळपास स्टॉक अँड्रॉइड अनुभव मिळेल, जो लावाच्या आधीच्या फोनमध्येही दिला गेला होता.
बॅटरी क्षमतेबाबत या स्मार्टफोनमध्ये 7,000 एमएएचची दमदार बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. आयईसीईई सर्टिफिकेशन साइटवर अशा क्षमतेचा लावा फोन दिसल्याचं समोर आलं आहे. चार्जिंगसाठी 66 वॅट फास्ट चार्जर बॉक्समध्ये मिळेल, अशीही चर्चा आहे.
किंमतीबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी, मागील अग्नी 3 ची सुरुवातीची किंमत 20,999 रुपये होती. त्यामुळे अग्नी 4 हा 25,000 रुपयांखाली उपलब्ध होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. या किंमत श्रेणीत हा फोन वनप्लस नॉर्ड सीई 5, इन्फिनिक्स जीटी 30 आणि पोको एक्स7 यांसारख्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देईल.
लावा अग्नी सिरीज भारतीय ग्राहकांना परवडणाऱ्या दरात प्रीमियम फीचर्स देण्यासाठी ओळखली जाते. अग्नी 4 मधील मेटल बिल्ड, दमदार प्रोसेसर आणि मोठी बॅटरी यामुळं हा फोन मिड-रेंज मार्केटमध्ये चर्चेचा विषय ठरणार आहे. अधिकृत लाँचनंतर त्याचे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाहीर होणार आहेत, मात्र सध्याच्या लीकनुसार हा फोन बजेट सेगमेंटमधील गेम-चेंजर ठरू शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule