
येवला, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।
: येवला नगराध्यक्ष पदाचा निर्णय मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते घेतला जाईल. तसेच येवला शहराच्या विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.
आमदार पंकज भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवला नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. तसेच यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नगरपालिका निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, उपाध्यक्ष दत्ता निकम, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दिपक लोणारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. येवला नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवला शहरातील एकूण १३ प्रभागात इच्छुक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शेकडो सक्षम उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी इच्छुक उमेदवारांकडून येवला शहराच्या विकासाच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण कल्पना, उपक्रम आणि योजना जाणून घेण्यात आल्या.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यक्षम, प्रामाणिक आणि लोकाभिमुख उमेदवारांची निवड करण्यावर भर देण्यात आला आहे. या बैठकीदरम्यान येवल्याच्या विकासासाठी योग्य त्या उमेदवारांना संधी द्यावी, अशी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली. त्यावर मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV