
पुणे, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी युवती काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वतीने शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) उमेदवारांसाठी मोफत ऑनलाइन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. या उपक्रमाच्या संयोजक भाग्यश्री ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी शहराध्यक्ष नम्रता बोंदर, मृणाल ओव्हाळ, हेमा रणदिवे आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाल्या, ‘राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने २३ नोव्हेंबर रोजी टीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी दोन आठवडे मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे. या शिबिरात पक्षाचे युवा नेते पार्थ पवार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विधिज्ञ संध्या सोनवणे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम हे उमेदवारांना ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरात उमेदवारांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, म्हणून ऑनलाईन पद्धतीनेच विविध विषयांचे शिक्षणतज्ज्ञ यांच्या चित्रफितींच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील. तसेच प्रश्नोत्तरांचा सराव घेण्यात येणार असून त्यासाठी प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिकाही ऑनलाईन माध्यमातून पुरविण्यात येणार आहेत, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु