
पुणे, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचा २५ वा स्मृतिदिन आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत पुण्यात ‘ग्लोबल पुलोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांना यंदाचा ‘पु. ल. स्मृती सन्मान’ जाहीर करण्यात आला आहे.‘या महोत्सवात बालगंधर्व रंगमंदिर, बालगंधर्व कलादालन आणि झपुर्झा येथे सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, चर्चासत्र, लघुपट आणि व्यंगचित्र प्रदर्शन अशा विविध उपक्रमांची रेलचेल असणार आहे,’ अशी माहिती ‘ग्लोबल पुलोत्सव’चे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली. अजित गाडगीळ, वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार या वेळी उपस्थित होते.
व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (६ नोव्हेंबर) ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, ‘या सम हा’ हा लघुपट दाखवला जाईल. ‘काळापुढचे पुलं’ या विषयावर विजय केंकरे, श्रीरंग गोडबोले यांच्याशी शुक्रवारी (७ नोव्हेंबर) परिसंवाद, तर शनिवारी (८ नोव्हेंबर) ‘आस्वादक पुलं’ या विषयावर कौशल इनामदार, भानू काळे यांच्याबरोबर परिसंवाद होईल. शुक्रवार-शनिवार याच दोन दिवसांत ‘झपुर्झा’त ‘रंगरेषांच्या सान्निध्यात’ ही कार्यशाळा, पद्मश्री अच्युत पालव यांच्याशी संवाद आणि ‘जलरंग’ कार्यशाळा होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु