
पुणे, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।
नव्याने रचनात्मक आराखडा (स्ट्रक्चरल प्लॅन) तयार करून अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, वीज आणि इतर पायाभूत सुविधांच्या उभारणीस पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) प्राधान्य दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात २४८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेची छाननी सध्या सुरू आहे.प्रारुप विकास आराखडा (डीपी) रद्द झाल्यानंतर पीएमआरडीए प्रशासनाने वरील कार्यवाही सुरू केली आहे. प्रमुख महामार्गांबरोबरच दोन गावांना जोडणाऱ्या आवश्यक संपर्क रस्त्यांचाही छाननीमध्ये समावेश आहे. यापूर्वी प्रशासनाकडून रस्त्यांसाठी निविदा काढल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील काळात पीएमआरडीए क्षेत्रातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे असावेत, अशा सूचना दिल्या होत्या.त्यामुळे, पूर्वीच्या डांबरी रस्त्यांच्या निविदा रद्द करून नवीन तांत्रिक मानकांनुसार निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार हिंजवडी, चाकण, माण, तळेगाव आदी औद्योगिक व नागरी भागांतील वाढत्या वाहतुकीवरील उपाय म्हणून रस्ते रुंदीकरण आणि काही ठिकाणी नव्या मार्गांची निर्मिती करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु