
पुणे, 3 नोव्हेंबर (हिं.स.)महापालिकेने शहरातील पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर सशुल्क पार्किंग सुरु करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. सध्या तांत्रिक प्रक्रिया सुरू असून नोव्हेंबरमध्ये ती पूर्ण होईल. त्यानंतर महापालिकेकडून पुढील महिन्यापासून सशुल्क पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरेदी व विविध कामानिमित्त मध्यवर्ती भागात येणाऱ्या नागरिकांची वाहने लावण्याची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील प्रमुख रस्त्यांवर खरेदीसाठी किंवा विविध प्रकारच्या कामानिमित्त नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र स्थानिक रहिवासी, व्यावसायिकांकडून त्यांची वाहने संबंधित पार्किंगच्या ठिकाणी रात्रंदिवस व कायमस्वरूपी लावून पार्किंग अडविण्याचा प्रयत्न केला जातो. मध्यवर्ती भागात किंवा उपनगरांमध्ये येणाऱ्या नागरिकांना जागा उपलब्ध होत नाही. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याचे म्हणणे शहर वाहतूक पोलिसांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर मांडले होते. त्यामुळे महापालिकेने सशुल्क पार्किंग सुरू करण्यास प्राधान्य दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु