
पुणे, 3 नोव्हेंबर (हिं.स.)पुणे स्थानकावरून रोज सुमारे दीड लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांच्या तक्रार निवारणासाठी रेल्वे प्रशासनाने पुण्याच्या नियंत्रण कक्षात पहिल्यांदाच ‘वॉर रूम’ची स्थापना केली आहे. प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच त्याला प्रतिसाद दिला जातो. तर त्या तक्रारीचा निपटारादेखील वीस मिनिटांच्या आत केला जातो. परिणामी स्थानकावर होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे होत आहे.रेल्वे मंत्रालयाने देशात सर्वाधिक प्रवाशांची गर्दी असणारी १७ स्थानके निवडली असून यात पुणे स्थानकाचादेखील समावेश आहे. त्यामुळे सण, उत्सवांच्या काळात रेल्वे गाड्यांना प्रवाशांच्या गर्दीचे नियमन करण्यासाठी पुणे स्थानकावर ‘वॉर रूम’ स्थापन केली आहे. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांचीदेखील नेमणूक करण्यात आली. यामुळे फलाटावरील अथवा रेल्वे गाडीतील गर्दीवर लक्ष ठेवणे, अथवा त्यानुसार निर्णय घेणे सोपे झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु