
नाशिक, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।
- नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि भुसावळचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्यासह राज्य शासनाचे अधिकारी, तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांची कुंभमेळा २०२७ च्या नियोजनासाठी समन्वय बैठक झाली.
या बैठकीत कुंभमेळ्यासाठी रेल्वे व्यवस्थापन सुरळीत होण्याकरिता विभागीय समन्वय, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता, सुरक्षा आणि अन्य महत्त्वाच्या बाबींवर सखोल चर्चा झाली. या बैठकीस कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होते.
या ऐतिहासिक आणि भव्य धार्मिक सोहळ्यासाठी भुसावळ रेल्वे विभाग संपूर्णपणे सज्ज असून, उत्कृष्ट समन्वय, आधुनिक पायाभूत सुविधा व प्रवाशांच्या सोयी सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले. रेल्वे प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा यांच्यातील समन्वय आणि पाहणी उपक्रम हे कुंभमेळासाठी अपेक्षित लाखो भाविकांना दर्जेदार सुविधा आणि सुरळीत व्यवस्थापन प्रदान करण्याच्या बांधिलकीचे प्रतीक असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. कुंभमेळ्यासाठी सर्वांत जास्त भाविक हे रेल्वेने नाशिकला येतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV