
सोलापूर, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। सिकंदर हा महाराष्ट्रातून जाऊन पंजाबमध्ये कुस्त्या करीत होता. पैसे कमावत होता. त्याचे हे वर्चस्व सहन न झालेल्यांनीच त्याला फसवून असल्या खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे. आम्ही गरीब आहोत कष्ट करून खाणारे आहोत असा आरोप महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचे वडील रशीद शेख यांनी केला. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी बेकायदा शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे.शस्त्र पुरविणाऱ्या रॅकेटमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. सिकंदर हा राजस्थानमधील पापला गुर्जर टोळीशी संबंधित असल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सिकंदरचे वडील रशीद शेख यांच्याशी संवाद साधला असता ते माहिती देत होते.
सिकंदर हा एक कुस्ती केली तर दोन लाख रुपये जिंकायचा. दररोजचा त्याचा खर्च खुराक व अन्य मिळून दहा ते बारा हजार रुपये आहे. त्याला पैशाला कुठेही कमी नाही. आमच्या खानदानात असला प्रकार होणार नाही. घरी पंधरा ते वीस बुलेट मोटरसायकली, चार चाकी गाड्या आहेत. वापराविना त्या खराब होऊ नयेत म्हणून आम्ही त्या वापरायला दुसऱ्याला देतोय. वर्षाला किमान दोन कोटी रुपये मिळवणारा माझा मुलगा असले उद्योग कधीच करणार नाही. आम्हाला न्याय मिळेल, आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याचे रशीद शेख यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड