
बहुचर्चीत पिंटू शिर्के हत्याकांडात सहभाग असल्याचा होता आरोप
नागपूर, 03 नोव्हेंबर (हिं.स.) : नागपूरच्या पिंटू शिर्के हत्या प्रकरणात कुख्यात गुन्हेगार राजू भद्रे याची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. भद्रेने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर हा निर्णय देण्यात आला. राजू भद्रे यांची बाजू वरिष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा, वकील प्रफुल्ल मोहगावकर आणि वकील शुभंकर डाबले यांनी मांडली. पुरावे आणि साक्ष विचारात घेतल्यानंतर न्यायालयाने भद्रेना सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले.
पिंटू शिर्के याची हत्या जमिनीच्या वादातून करण्यात आली होती. राजघराण्यातील अन्नपूर्णा देवी भोसले यांनी 21 एकर जमीन शिर्के कुटुंबीयांना भेट म्हणून दिली होती. त्यापैकी 7 हजार चौरस फूट जमिनीवर विजय मते याने अतिक्रमण केले असल्याचा आरोप होता. त्यावरून मते आणि शिर्के यांच्यात वाद होता. त्यातूनच गँगवार झाले होते. 18 जुलै 2001 रोजी मते याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यात संजय गायकवाड याचाही खून करण्यात आला. त्याच प्रकरणात शिर्के याला अटक करण्यात आली होती. नंतर त्या घटनेचा वचपा काढण्यासाठी विजय मते व त्याच्या साथीदारांनी शिर्के याची भरदिवसा नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हत्या केली होती. रघुजीनगर येथील स्वप्नील उर्फ पिंटू शिर्के याला संजय गायकवाड हत्याप्रकरणी अटक केली होती. त्याला 19 जून 2002 रोजी न्यायमंदिरातील सहाव्या मजल्यावरील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. तिथे त्याची आईदेखील होती. पिंटूला जामीन मिळावा म्हणून प्रयत्न करण्यात येत होते. तेव्हा न्यायमंदिराच्या सहाव्या मजल्यावर पोलिसांच्या समक्ष आरोपींनी पिंटू शिर्केची तलवार, गुप्ती व अन्य धारदार शस्त्रांनी हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आली होती.
पिंटू शिर्के हत्याकांड प्रकरणावर 2017 मध्ये निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने विजय मते, कुख्यात गुन्हेगार राजू भद्रे, उमेश डहाके, किरण कैथे, दिनेश गायकी, रितेश गावंडे आणि कमलेश निंबर्ते यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली होती. तर हायकोर्टाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मंगेश चव्हाण, महेश बांते, पांडूरंग इंजेवार आणि मारोती उर्फ नव्वा वाळके यांचा समावेश आहे. या चौघांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले होते.
----------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु