
पुणे, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।हवेली पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्याने थेऊर, केसनंद, कोरेगाव मूळ व खानापूर गणात अधिक चुरस पाहायला मिळू शकते. त्यात बदललेली प्रारूप रचना व गट, गणांच्या आरक्षणामुळे प्रस्थापितांना धक्का व नव्यांना संधी मिळणार आहे. विधानसभेप्रमाणे महायुती व आघाडी न झाल्यास प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमध्येच लढतीचे चित्र आहे. दरम्यान पक्षाऐवजी स्थानिक विकास आघाडी करता येईल का, याचीही चाचपणी स्थानिक नेत्यांकडून सुरु असल्याची चर्चा आहे.
हवेली पंचायत समितीवर सन २०१७च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसपाठोपाठ शिवसेना व भाजपचे बलाबल होते. त्यानुसार सुरुवातीला सभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली महाडीक, हेमलता काळोखे, दिनकर हरपळे, संजीवनी कापरे व भाजपच्या फुलाबाई कदम, अनिल टिळेकर व शिवसेनेचे बाळासाहेब देशमुख, नारायण आव्हाळे यांनाही नेतृत्वाची संधी मिळाली. मात्र, हवेलीतील गावांचा टप्प्याटप्प्याने महापालिकेत समावेश झाला. तसेच, पंचायत समितीची गणसंख्याही कमी होऊन काही काळ सभापतिपदही रिक्त राहिले. सध्या पूर्व हवेलीत पेरणे- लोणीकंद, कोरेगाव मूळ- केसनंद, उरुळी कांचन- सोरतापवाडी, थेऊर- आव्हाळवाडी, लोणी काळभोर-कदमवाकवस्ती, खेड शिवापूर- खानापूर हे एकूण १२ पंचायत समिती गण अस्तित्वात आले आहेत. यात लोणीकंद, पेरणे व आव्हाळवाडी गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने येथील पुरुष इच्छुक थंडावले आहेत. तर, कदमवाकवस्ती (अनुसूचित जाती), उरुळी कांचन (अनुसूचित जाती महिला), सोरतापवाडी (नागरिकांचा मागास प्रवर्ग), लोणी काळभोर (मागास प्रवर्ग महिला), खेड शिवापूर (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) या गटातही अपेक्षेप्रमाणे आरक्षण न आल्याने बऱ्याच कालावधीपासून तयारी करत असलेल्या प्रस्थापित इच्छुकांच्या गोटात शांतता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु