अमरावतीतील टिरलिंग पवारांच्या मृत्यूनंतरही कुटुंबियांना स्क्रब टायफसचा धोका कायम, भाचीवरही उपचार सुरू
अमरावती, 3 नोव्हेंबर (हिं.स.) टिरलिंग पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना स्क्रब टायफसचा धोका कायम आहे. त्यांची पत्नी मंदा पवार आणि धाकटी मुलगी राशी पवार यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या भाचीलाही या आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे
स्क्रब टायफस: पवार यांच्या भाचीवरही उपचार सुरु कुटुंबियांतील दोघींची प्रकृती स्थिर, गावात भीतीचे वातावरण


अमरावती, 3 नोव्हेंबर (हिं.स.)

टिरलिंग पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना स्क्रब टायफसचा धोका कायम आहे. त्यांची पत्नी मंदा पवार आणि धाकटी मुलगी राशी पवार यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या भाचीलाही या आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

वर्ध्यात शिक्षण घेणारी सुकेशा भोसले (वय २४) ही टिरलिंग पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी गावी आली होती. दोन-तीन दिवस गावात राहिल्यानंतर ती वर्ध्याला परतली. मात्र, तिला ताप येऊ लागला असून, स्क्रब टायफसची लक्षणे दिसत आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून ती आजारी असून, जेवणही करत नसल्याचे तिच्या मामाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या टिरलिंग पवार यांच्या पत्नी मंदा पवार व धाकटी मुलगी राशी पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी दिली. राशीचा अहवाल आधीच पॉझिटिव्ह आला असून, तिच्या आईच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. पापळ येथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर शनिवार दुपारी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक १ मध्ये दाखल करण्यात आले आहे.

या आजाराची चाहूल लागल्याने गावात भीतीचे वातावरण आहे. अनेक ग्रामस्थांमध्ये ताप, अंगदुखी आणि जेवण न करण्यासारखी लक्षणे दिसून येत आहेत. स्क्रब टायफसचे निदान झाल्यानंतर गावात फवारणी आणि धुवारणी करण्यात आली होती. मात्र, धोका लक्षात घेता ही प्रक्रिया आणखी काही दिवस नियमितपणे सुरू ठेवावी, अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे.

गावातील बहुतेक नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असल्याने, आरोग्य विभागाने त्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. हा आजार पिसूंमुळे पसरत असल्याने शेतीकाम करताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande