
परभणी, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। सोनपेठ तालुक्यातील शिरोरी येथील लुल्ला मासाब दर्गा परिसरात कंदुरीच्या कार्यक्रमानिमित्त आलेल्या परभणी येथील दोघा युवकांचा गोदावरी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. मृतांमध्ये रौफ खान करीम खान (वय २५, रा. गांधी नगर, धार रोड, परभणी) आणि शेख सुफियान शेख जावेद (वय १६, रा. परभणी) या दोघांचा समावेश आहे. हे दोघे नातेवाईकाच्या कंदुरीच्या कार्यक्रमासाठी शिरोरी येथील लुल्ला मासाब दर्गा येथे आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर फिरण्यासाठी ते गोदावरी नदीकाठी गेले. दरम्यान, पोहण्याचा मोह झाल्याने दोघेही नदीच्या पात्रात उतरले. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाह याचा अंदाज न आल्याने ते गटांगळ्या खात खोल पाण्यात गेले आणि बुडाले. काही वेळानंतर नदीकाठी कलईचे काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कपड्यांचे बंडल दिसले, परंतु युवक दिसले नाहीत. शंका आल्याने त्यांनी तातडीने शोध सुरु केला आणि सोनपेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिस आणि ग्रामस्थांनी संयुक्तपणे शोधमोहीम राबविली. शेख सुफियान या युवकाचा मृतदेह मिळाला, तर रौफ खान याचा मृतदेह नदीपात्रात खळीजवळ आढळून आला. या घटनेमुळे परभणीत शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास सोनपेठ पोलिस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis