
अमरावती, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। पांढऱ्या सोन्यावर अवकाळीचा मारा बसल्याने शेतकऱ्यांसमोर आणखी एक नवे संकट ओढवले आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने तालुक्यात थैमान घातले होते. विशेषतः खरीप हंगामातील पीक असलेल्या कापूस उत्पादकशेतकऱ्यांसाठी हा पाऊस मोठा चिंतेचा विषय बनला आहे. काढणीला आलेला आणि काही ठिकाणी वेचणी सुरू झालेला कापूस या पावसामुळे ओलाचिंब झाल्याने उन्हात वाळवन्याची वेळ कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. उन्हात कापूस वाळवण्याची कसरत करावी लागत आहे. वेचणी केलेला आणि शेतात उघड्यावर ठेवलेला कापूस पावसामुळे भिजल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे. कापसाची प्रत (गुणवत्ता) खराब होऊ नये, त्याला बुरशी लागू नये आणि योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी आता ओला झालेला कापूस घरासमोर, अंगणात किंवा मिळेल त्या मोकळ्या जागेत उन्हात वाळू घालण्याची कसरत करत आहेत. कापूस भिजल्यामुळे तो काळवंडण्याची आणि त्याची प्रतवारी निकृष्ट होण्याची भीती आहे. यामुळे बाजारपेठेत योग्य भाव मिळण्यासाठी कसरत करावी लागत आहे. व्यापारी कमी दरात कापूस खरेदी करण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. कष्टावर पाणी: वर्षभर काबाडकष्ट करून पिकवलेला कापूस ऐन वेचणीच्या वेळी भिजल्याने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले गेले आहे. कापसाचे उत्पादन घटले आहेच, पण जो कापूस हाती आला तोही खराब झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी