
रत्नागिरी, 3 नोव्हेंबर, (हिं. स.) : पत्रकार मुझम्मील काझी यांना स्वतंत्र कोकणराज्य अभियानातर्फे कोकण रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी केली याबाबतची घोषणा केली.
डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न धडाडीने मांडणारे आणि ‘ग्रामीण वार्ता’ या न्यूज डिजिटल मीडियाचे संस्थापक, उक्षी गावचे सुपुत्र, गाव विकास समितीचे जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी यांना कोकण रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.
गेली आठ वर्षे मुझम्मील काझी यांनी डिजिटल माध्यमाचा अत्यंत प्रभावी वापर करून कोकणातील ग्रामीण भागातील अनेक मूलभूत प्रश्न, स्थानिक स्तरावरील समस्या आणि प्रशासकीय कामकाजातील त्रुटी अत्यंत परखडपणे आणि निःपक्षपातीपणे समाजासमोर आणल्या. तळागाळातील सामान्य नागरिकांच्या समस्यांना प्रभावीपणे वाचा फोडल्यामुळे अनेक वेळा प्रशासनाला या प्रश्नांची गंभीर दखल घेणे भाग पडले आहे. विविध यूट्यूब चॅनेलमध्ये यशस्वीपणे जबाबदारी पार पाडल्यानंतर मुझम्मील काझी यांनी स्वतःच्या ‘ग्रामीण वार्ता’ या न्यूज डिजिटल मीडियाची सुरुवात केली. ‘ग्रामीण वार्ता’च्या माध्यमातून त्यांनी आजवर अनेक समस्यांचा पाठपुरावा करत गरजू लोकांना न्याय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या या कार्याची महती लक्षात घेऊन त्यांना कोकण रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी