
रायगड, 5 नोव्हेंबर, (हिं.स.)। मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर पुन्हा एकदा संविधानप्रेमींचा जनसागर उसळणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली “संविधान सन्मान सभा” ही देशातील सामाजिक न्याय, लोकशाही आणि संविधान मूल्यांसाठीची मोठी चळवळ ठरणार आहे.
यापूर्वी २०२३ साली झालेल्या महासभेला शिवाजी पार्क तुडुंब भरले होते. लाखो नागरिकांनी संविधानाच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक समतेच्या नूतन हाकेसाठी एकत्र येऊन इतिहास घडविला होता. यंदा पुन्हा एकदा तशीच प्रचंड गर्दी अपेक्षित आहे.या सभेचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर करणार आहेत. सभेमध्ये संविधानाच्या रक्षणाचा निर्धार, मनुवादाविरोधातील भूमिका, सामाजिक न्यायाची पुनर्स्थापना आणि लोकशाही मूल्यांचे जतन या विषयांवर चर्चा होणार आहे.
सभेसाठी देशभरातून लाखो कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होणार आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून खास वाहतूक व्यवस्था करण्यात येत असून, सभेच्या आयोजनासाठी स्वयंसेवकांचे संघटन कार्य सुरू आहे. संविधान सन्मान सभेद्वारे सामाजिक समतेचा आणि लोकशाहीचा आवाज पुन्हा एकदा शिवाजी पार्कवर घुमणार असून, ही सभा आगामी राजकीय घडामोडींना नवी दिशा देईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके