नाशकात शाळा बचाव समितीचे धरणे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू
नाशिक, 5 नोव्हेंबर, (हिं.स.)। : महापालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक बी. डी. भालेकर शाळा पाडण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेच्या जागी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर चार कोटींचे विश्रामगृह बांधण्याचे नियोजन होते. मात्र, या निर्णयाला शाळा बचाव कृ
बी. डी. भालेकर शाळा जमीनदोस्त करण्यावर प्रशासन ठाम शाळा बचाव समितीचे धरणे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू


नाशिक, 5 नोव्हेंबर, (हिं.स.)। : महापालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक बी. डी. भालेकर शाळा पाडण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेच्या जागी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर चार कोटींचे विश्रामगृह बांधण्याचे नियोजन होते. मात्र, या निर्णयाला शाळा बचाव कृती समितीने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर महापालिका प्रशासनाने एक पाऊल मागे घेतल्याचे चित्र आहे. कारण प्रस्तावित विश्रामगृहाचा विषय बाजूला ठेवला आहे. प्रथम धोकादायक भालेकर शाळेचे पाडकाम येत्या एक-दोन दिवसांत केले जाणार आहे. शाळा बचाव समितीने धरणे आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान, बी. डी. भालेकर शाळा पाडण्यावर आयुक्त मनीषा खत्री ठाम आहेत; परंतु विश्रामगृह उभारण्याचा निर्णय मागे घेतला आहे. शाळेच्या ठिकाणी काय उभारायचे, याचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे. कृती समितीने भालेकर शाळा वाचविण्यासाठी शाळेसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. शाळा पाडकामासाठी गेल्या महिन्यात निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. आकार कन्स्ट्रक्शनला हे काम मिळाले आहे. ठेकेदार महापालिकेला दहा लाख ११ हजारांची रक्कम देणार असून, त्या बदल्यात शाळेचा मलबा व साहित्याची विल्हेवाट स्वतः लावणार आहे. भालेकर शाळा वाचविण्यासाठी बचाव कृती समितीची स्थापना केली असून, या समितीने आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेत ही शाळा पाडू नये, अशी मागणी केली. पण आयुक्त खत्री यांनी ही शाळा जीर्ण झाली आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही शाळा धोकादायक असल्याचा अहवाल आला आहे.

त्यामुळे शाळा पाडली जाणार असल्याचे समितीला आयुक्तांनी स्पष्ट सांगितले. यानंतर समितीने आक्रमक होत शाळेसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. याप्रकरणी वाढता विरोध पाहता आयुक्तांनी विश्रामगृह उभारणीचा निर्णय थांबवला आहे. शाळा पाडू नये याकरिता शाळेचे माजी विद्यार्थी, लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयास विरोध केला आहे. दरम्यान, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या दरबारी हा प्रश्न गेला असता, त्यांनी आवश्यकता नसेल तर शाळा पाडली जाणार नसल्याचे म्हटले होते. पण शाळा धोकादायक असल्याने ती पाडल्याशिवाय पर्याय नसल्याचे निरीक्षण महापालिकेचे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande