
रत्नागिरी, 5 नोव्हेंबर, (हिं. स.) : नवोदित गायक कलाकारांसाठी मैलाचा दगड ठरलेली व 1981 पासून सातत्याने होणारी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राची आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धा येत्या 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता रत्नागिरीमध्ये होणार आहे. रत्नागिरीतील खल्वायन संस्थेच्या सहकार्याने होत असलेली ही या स्पर्धेची रत्नागिरी केंद्रांवरील प्राथमिक फेरी असून ही स्पर्धा रत्नागिरीत ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृहाच्या भगवान परशुराम सभागृहात होणार आहे.
ज्युनिअर, सिनियर कॉलेज, डिप्लोमा - डिग्री इंजिनीअरिंग कॉलेज, बी एड, डी एड, बीसीए, अॅग्रिकल्चर, लॉ, इत्यादी अभ्यासक्रमांच्या विद्यापीठातील कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. स्पर्धेत फक्त मराठी किंवा हिंदी भाषेतील गीत, गझल, भावगीत, भक्तीगीत किंवा अभंग सादर करता येईल. चित्रपट गीत व नाट्यसंगीत सादर करता येणार नाही. गीत सादर करण्याचा अवधी ५ मिनिटांचा राहील. हार्मोनियम, तबला आणि तानपुरा इतकीच वाद्ये साथसंगतीसाठी वापरता येतील. वाद्ये व साथीदार संस्थेतर्फे उपलब्ध होतील. तथापि स्पर्धक स्वत:चे साथीदार आणू शकतात. हार्मोनियम आणि तबला साथीशिवाय स्पर्धेत भाग घेता येणार नाही. गीतांच्या लिखित शब्दांची प्रत किंवा भ्रमणध्वनी समोर ठेवून गाता येणार नाही.
स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेऱ्यात होईल. अंतिम फेरी मुंबईत २५ डिसेंबरला सकाळी साडेनऊ वाजता दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात होईल. अधिक नियम आणि अटी तसेच नावनोंदणीसाठी श्रीनिवास जोशी (9422473080 / 9404332705) यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी