
रायगड, 5 नोव्हेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना महायुतीकडून कर्जत तालुक्यातील कळंब जिल्हा परिषद गणातून हरिश्चंद्र निरगुडा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या घोषणेमुळे स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले असून महायुती कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
हरिश्चंद्र निरगुडा हे स्थानिक पातळीवर सामाजिक कार्य, आदिवासी समाजातील जनजागृती आणि शैक्षणिक विकासासाठी ओळखले जातात. त्यांनी दीर्घकाळ आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर काम करत विविध आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर होताच आदिवासी समाजाने समाधान व्यक्त केले असून, ही जनतेचा आवाज विधानसभेपर्यंत नेणारी उमेदवारी आहे अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले की, “कळंब गणातील विकासकामे गतीमान करण्यासाठी आणि जनतेचा विश्वास परत मिळवण्यासाठी हरिश्चंद्र निरगुडा हे सर्वात योग्य उमेदवार आहेत.” या वेळी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून उमेदवाराला शुभेच्छा दिल्या. दरम्यान, या उमेदवारीमुळे विरोधकांच्या गोटात मात्र हालचाल वाढली आहे. जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत कळंब गणात चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. निरगुडा यांच्या प्रचाराची सुरुवात लवकरच होणार असून स्थानिक पातळीवरील पक्ष संघटनांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जनतेच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणारे आणि विकासाभिमुख दृष्टीकोन ठेवणारे उमेदवार म्हणून हरिश्चंद्र निरगुडा हे या निवडणुकीत चर्चेचे केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके