
धुळे, 5 नोव्हेंबर (हिं.स.) महानगरपालिकेच्या होवू घातलेल्या निवडणूकांपूर्वी मतदार यादीतील दुबार, मयत, बोगस पत्त्यावरील नोंदणी केलेले तसेच कुठल्याही पुरावा नसतांना मतदार यादीत घुसवलेले मतदार कमी करुन त्यांचा मतदानाचा हक्क रद्द करण्यात यावा, आणि मतदार यादीचे शुध्दीकरण करावे, तसेच अशी नोंदणी करणार्या बिएलओ यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकार्यांनी आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी एक निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ०७ धुळे विधानसभा मतदारसंघ आणि धुळे महानगरपलिका क्षेत्रात जोडण्यात आलेल्या ग्रामीण भागातील ११ ग्रामपंचायतीतील मतदारांचा समावेश आहे. या संबंधी महानगरपालिकेने प्रसिध्द केलेली मतदार यादी दोषमुक्तनाही. कारण ०७ धुळे विधानसभा मतदारसंघात दुबार, तिबार, बोगस मतदारांची जवळजवळ २७ ते ३० हजार मतदार (बोगस) नोंदविलेले आहेत. एकाच पत्त्यावर १०० ते २०० मतदारांची नव्याने नोंद कशी होवू शकते ? हा एक गंभीर प्रकार आहे. अशा मतदारांची नोंदणी करणारे बीएलओची चौकशी करुन आम्हाला सदर मतदारांची निवासस्थाने दाखविण्यासंबंधी किंवा त्यांनी कशाच्या आधारावर सदर मतदारांची नोंदणी केली याचे पुरावे बीएलओ कडून मागवून आम्हाला अवगत करुन देण्यासंबंधी आपण आदेश पारीत करावेत. तसेच मतदार याद्या स्वच्छ आणि दोषमुक्तकरुन त्यानंतरच महानगरपालिकेच्या निवडणूका घ्याव्यात. अन्यथा मा.न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतील. असा इशारा देत हे निवेदन मा.जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना देण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर