संजय राऊत यांची तब्येत बिघडली; फोर्टिस रूग्णालयात दाखल
मुंबई, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना भांडूप येथील फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राऊत यांच्यावर सध्या तेथे वैद्यक
संजय राऊत


मुंबई, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना भांडूप येथील फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राऊत यांच्यावर सध्या तेथे वैद्यकीय उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्वतःच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती सार्वजनिक पत्रकाद्वारे दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत हे सध्या सार्वजनिक कार्यक्रम आणि माध्यमांपासून दूर आहेत. खराब प्रकृतीमुळे त्यांनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते रूटीन चेकअपसाठी फोर्टिस रूग्णालयात दाखल झाले आहेत. आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर ते भांडूप येथील मैत्री निवास्थानी विश्रांतीसाठी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राऊत यांच्या अनुपस्थितीबद्दल अनेक चर्चा सुरू होत्या. त्यावर त्यांनी स्वतःच एक पत्रक जारी करून स्पष्ट केले होते की, “अचानक प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचा बिघाड झाल्याने उपचार सुरू आहेत. मी लवकरच बरा होऊन आपल्या भेटीस येईन.” त्यांनी कार्यकर्त्यांना आणि शुभेच्छुकांना अनावश्यक चिंता करू नये, अशी विनंतीही केली होती.

दरम्यान, संजय राऊत यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना सध्या गर्दीत मिसळणे आणि बाहेर जाणे टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राऊत यांनी नववर्षात पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात परतण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande