
धुळे, 5 नोव्हेंबर (हिं.स.) धुळे जिल्ह्यातील तीन नगर परिषद आणि एक नगरपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. जिल्ह्यातील शिरपूर, दोंडाईचा व नव्याने स्थापन झालेली पिंपळनेर नगरपरिषद तसेच शिंदखेडा नगरपंचायतची निवडणूक येत्या २ डिसेंबर रोजी होणार आहे. यासाठी निवडणूकीचा कार्यक्रम काल निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानूसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास १० नोव्हेंबर पासून सुरूवात होईल. १७ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे. १८ रोजी अर्ज छाननी होईल. तसेच १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. २१ ते २५ नोव्हेंबर अपिल कालावधी देण्यात आला आहे. २६ नोव्हेंबरला चिन्ह वाटप होईल तर मतदान २ डिसेंबर रोजी होऊन ३ डिसेंबरला मतमोजणी व निकाल जाहीर केले जाणार आहेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, दोंडाईचा आणि पिंपळनेर नगरपरिषदेसाठी यंदा निवडणूक होत आहे. तसेच शिंदखेडा नगरपंचायतीचेही मतदान होणार आहे. त्यासाठी राजकीय वातावरण तापण्यास सुरूवातङ्ग झाली आहे. जिल्ह्यातील राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साह संचारला असून भेटी गाठींसह प्रचाराला प्रारंभ करण्यात आला आहे. शिरपूर येथे माजी मंत्री अमरिशभाई पटेल, दोंडाईचा व शिंदखेडा येथे पालकमंत्री जयकुमार रावल तर पिंपळनेरमध्ये माजी खा. बापू चौरे यांच्यासाठी यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर