
परभणी, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।
परभणी शहर महानगरपालिकेस वाढीव जीएसटी अनुदान मंजूर होण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण तात्काळ स्थगित करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने दिले आहेत.
नगर विकास विभागाने जारी केलेल्या शासन पत्रानुसार, राज्यातील महानगरपालिकांना वाढीव जीएसटी अनुदान मिळावे या मागणीच्या पार्श्वभूमीवर शासनाने आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती सर्वंकष अभ्यास करून ३० दिवसांत शासनास अहवाल सादर करणार आहे.
या समितीच्या शिफारशींच्या आधारे संबंधित प्रस्ताव वित्त विभागास पाठविला जाईल, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे उपोषण न करता शासनाने स्थापन केलेल्या समितीच्या कार्याचा निष्कर्ष येईपर्यंत प्रतीक्षा ठेवावी, असेही नगर विकास विभागाने नमूद केले आहे.
शासन पत्रावर कक्ष अधिकारी धनंजय भागवत यांच्या स्वाक्षरी असून, प्रत प्रधान सचिव, उप सचिव आणि निवडनस्ती शाखा यांना देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis