
वॉशिंग्टन, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की ते या महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या जी-20 परिषदेत सहभागी होणार नाहीत. ट्रम्प यांनी बुधवारी सांगितले कि, मी दक्षिण आफ्रिकेत माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणार नाही. त्या देशाला जी-20 मध्ये असण्याचा हक्क नाही”.
मियामी येथे झालेल्या अमेरिका बिझनेस फोरम दरम्यान ट्रम्प म्हणाले, “दक्षिण आफ्रिकेत जी-20 ची बैठक आहे. मी तिथे जाणार नाही. दक्षिण आफ्रिकेला आता जी-20 मध्ये असायलाच नको, कारण तिथे जे घडले ते अत्यंत वाईट आहे. मी त्यांना सांगितले आहे, की मी जाणार नाही. मी तिथे माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणार नाही. त्या देशाला जी-20 मध्ये असण्याचा हक्क नाही.”
दक्षिण आफ्रिकेने 1 डिसेंबर 2024 रोजी एका वर्षासाठी जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारले होते आणि 22 ते 23 नोव्हेंबरदरम्यान जोहान्सबर्ग येथे या समूहाच्या नेत्यांच्या परिषदेला यजमानत्व देणार आहे. हा पहिलाच प्रसंग असेल की जी-20 शिखर परिषद आफ्रिकन खंडावर होणार आहे. भारताने डिसेंबर 2022 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत जी-20 चे अध्यक्षपद भूषवले होते आणि भारताच्या अध्यक्षतेखाली सप्टेंबर 2023 मध्ये नवी दिल्ली येथे 18वी जी-20 परिषद पार पडली होती. त्या वेळी तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन परिषदेला उपस्थित राहण्यासाठी भारतात आले होते.
जी-20 समूहात 19 देशांचा समावेश आहे — अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्कीये, ब्रिटन आणि अमेरिका — तसेच युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियनही सदस्य आहेत. भारताच्या अध्यक्षतेदरम्यानच आफ्रिकन युनियनला जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांच्या समूहाचा स्थायी सदस्य म्हणून अधिकृतपणे सामील करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode