
नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। पाकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी (दि.६) भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. गुरुवारी इस्लामाबादमध्ये 4.3 तीव्रतेचा, काबूलमध्ये 4.4 तीव्रतेचा आणि शिनजियांग मध्ये 4.7 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंप जाणवताच लोकांमध्ये भीती पसरली आणि अनेक जण घराबाहेर पडले.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनसीएस) गुरुवारी सकाळी शिनजियांगमध्ये झालेल्या भूकंपाची माहिती दिली. या भूकंपाची तीव्रता 4.7 नोंदवली गेली. हा भूकंप चीनमध्ये रविवारी आलेल्या 4.9 तीव्रतेच्या भूकंपानंतर काहीच दिवसांनी झाला. एनसीएस च्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबरचा तो भूकंप 130 किलोमीटर खोलवर झाला होता. यापूर्वी 7 सप्टेंबर रोजी चीनमध्ये 10 किलोमीटर उथळ खोलीवर 4.1 तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला होता.
एनसीएसच्या माहितीनुसार, अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे 4.4 तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप केवळ 10 किलोमीटर उथळ खोलीवर झाला असल्याने, त्या प्रदेशात आफ्टरशॉक्स येण्याची शक्यता जास्त आहे. एका वृत्तसंस्थेने सांगितले की, सोमवारी रात्री उत्तर अफगाणिस्तानात आलेल्या शक्तिशाली भूकंपात बुधवारीपर्यंत मृतांचा आकडा 27 वर पोहोचला असून जवळपास 1,000 जण जखमी झाले आहेत.
एनसीएसच्या माहितीनुसार, गुरुवारी पाकिस्तानमध्ये 4.3 तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप 240 किलोमीटर खोलवर झाला. याआधी पाकिस्तानमध्ये 160 किलोमीटर खोलीवर 3.6 तीव्रतेचा भूकंप झाला होता. 24 ऑक्टोबर रोजी या भागात 10 किलोमीटर उथळ खोलीवर 3.7 तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला होता, ज्यामुळे हा प्रदेश आफ्टरशॉक्ससाठी अतिसंवेदनशील बनला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode