
ओटावा , 6 नोव्हेंबर (हिं.स.)। अमेरिकेत एच-1बी व्हिसाची फी तब्बल 1 लाख अमेरिकन डॉलर (सुमारे ₹88 लाख) झाल्यामुळे आता कंपन्यांसाठी परदेशी कामगारांना नोकरी देणे खूप कठीण झाले आहे. याशिवाय काही असे एच-1बी व्हिसाधारक आहेत, जे सध्या अमेरिकेत काम करत असले तरी ते तेथे कायमस्वरूपी राहण्याची इच्छा बाळगत नाहीत. अशा परिस्थितीत कॅनडा आता या व्हिसाधारकांना आपल्या देशात काम देण्याच्या तयारीत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कॅनडा आपल्या “इनोव्हेशन इकोसिस्टम” (नवोन्मेषी अर्थव्यवस्था) ला बळकटी देण्यासाठी आणि कुशल परदेशी कामगारांना आकर्षित करण्याच्या रणनीतीअंतर्गत एच-1बी व्हिसाधारकांसाठी एक त्वरित इमिग्रेशन पाथवे सुरू करत आहे. अमेरिकेत अलीकडेच एच-1बी व्हिसाची फी वाढल्यामुळे अनेक कुशल कामगार प्रभावित झाले आहेत, आणि आता कॅनडा त्यांनाच आपल्या देशात आणू इच्छित आहे. त्याचबरोबर, हेल्थकेअर, संशोधन (रिसर्च) आणि प्रगत तंत्रज्ञान (अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी) या क्षेत्रांमध्ये कुशल व्यावसायिकांना नोकरी देण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे, कारण सध्या या क्षेत्रांमध्ये कामगारांची तीव्र कमतरता आहे.
कॅनडाने नुकताच 2025 साठीचा फेडरल बजेट सादर केला असून, त्यात इमिग्रेशनविषयक महत्त्वाचे बदल सुचवले गेले आहेत. सरकारने म्हटले आहे की, नव्या इमिग्रेशन पाथवेमुळे कॅनडाच्या इनोव्हेशन इकोसिस्टमला बळकटी मिळेल, कामगारांची कमतरता दूर केली जाईल आणि हेल्थकेअर, रिसर्च, अॅडव्हान्स इंडस्ट्रीज आणि इतर प्रमुख क्षेत्रांमध्ये सर्वोच्च प्रतिभा आकर्षित केली जाईल. बजेटमध्ये नमूद केले आहे की, हा नवीन एच-1बी पाथवे हा “इंटरनॅशनल टॅलेंट अट्रॅक्शन स्ट्रॅटेजी अँड अॅक्शन प्लॅन” चा भाग आहे.
सरकारच्या या योजनेनुसार, कॅनडा एकाच वेळी 1,000 परदेशी संशोधकांची नियुक्ती करणार आहे. या प्रकल्पासाठी 1.7 अब्ज कॅनडियन डॉलरचा निधी ठेवण्यात आला आहे. या गुंतवणुकीमुळे कॅनडातील विद्यापीठांना जगातील सर्वोत्तम संशोधकांना नियुक्त करण्याची आणि त्यांना अत्याधुनिक संशोधनासाठी आवश्यक साधने पुरवण्याची संधी मिळेल. त्याचप्रमाणे हेल्थकेअर आणि कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्येही मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणार आहे, जिथे सध्या डॉक्टर, नर्स, अभियंते, मेकॅनिक आणि बांधकाम कामगारांची गरज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode