लॅटिन अमेरिकेबरोबरचे व्यापारी संबंध भारताने केले दृढ
* भारत-पेरू व्यापार कराराची नववी आणि भारत-चिली सीईपीए वाटाघाटींची तिसरी फेरी यशस्वी नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर (हिं.स.) - लॅटिन अमेरिकेतील (दक्षिण अमेरिका खंड) देशांशी व्यापार संबंध दृढकरण्यासाठी आणि आर्थिक संबंधांचा विस्तार करण्यासाठी सरकारची वचनबद्
व्यापारी संबंध


व्यापारी संबंध


* भारत-पेरू व्यापार कराराची नववी आणि भारत-चिली सीईपीए वाटाघाटींची तिसरी फेरी यशस्वी

नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर (हिं.स.) - लॅटिन अमेरिकेतील (दक्षिण अमेरिका खंड) देशांशी व्यापार संबंध दृढकरण्यासाठी आणि आर्थिक संबंधांचा विस्तार करण्यासाठी सरकारची वचनबद्धता अधोरेखित करत, भारताने त्या प्रदेशातील भागीदार देशांशी व्यापारविषयक वाटाघाटींच्या दोन महत्त्वाच्या फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.

3 ते 5 नोव्हेंबर पेरूमध्ये लिमा येथे भारत-पेरू व्यापार कराराच्या वाटाघाटींची नववी फेरी घेण्यात आली. प्रस्तावित करारातील महत्त्वाच्या विषयांवर या चर्चांमध्ये लक्षणीय प्रगती झाली. त्यामध्ये वस्तू आणि सेवांचा व्यापार, मूलस्थानाबद्दलचे नियम (Rules of Origin), व्यापारातील तांत्रिक अडथळे, सीमाशुल्क प्रक्रिया, विवाद निराकरण आणि अतिमहत्त्वाच्या खनिजे (Critical Minerals) या मुद्द्यांचा त्यात समावेश होता.

पेरूच्या विदेशी व्यापार आणि पर्यटनमंत्री तेरेसा स्टेला मेरा गोमेझ, त्या खात्याचे उपमंत्री कैसर ऑगस्तो लिओना सिल्व्हा आणि अन्य वरिष्ठ अधिकारी समारोप समारंभाला उपस्थित होते. भारताचे पेरूमधील राजदूत विश्वास सपकाळ आणि सह-सचिव तथा मुख्य वाटाघाटी-संवादक विमल आनंद यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.

मंत्री महोदय गोमेझ यांनी यावेळी बोलताना, वाटाघाटी वेळेत पूर्ण करण्याविषयी पेरूची वचनबद्धता प्रकट केली. उभय अर्थव्यवस्था परस्परांना पूरक असल्याचे अधोरेखित करून त्यांनी, सदर करारामुळे व्यापार आणि गुंतवणुकीचा ओघ वाढेल अशी आशा व्यक्त केली. राजदूत सपकाळ यांनी, भारताची विकासाची संतुलित गती अधोरेखित करत, अतिमहत्त्वाची खनिजे, औषधे, वाहन-उद्योग, वस्त्रोद्योग आणि अन्नप्रक्रिया या क्षेत्रांत सहकार्याच्या नव्या संधी या करारामुळे उत्पन्न होतील असे नमूद केले.

वाटाघाटीच्या पुढच्या फेरीपूर्वी प्रलंबित/ अनिर्णित मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यासाठी आंतरसत्र बैठका घेण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. वाटाघाटींची पुढची फेरी नवी दिल्लीत जानेवारी-2026 मध्ये घेतली जाणार आहे.

तत्पूर्वी भारत-चिली सीईपीए अर्थात सर्वंकष आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींची तिसरी फेरी चिलीमध्ये सँटियागो येथे 27 ते 30 ऑक्टोबर 2025 या काळात पार पडली. या चर्चांमध्ये विविध मुद्द्यांचा समावेश होता- जसे की- वस्तू आणि सेवांमधील व्यापार, गुंतवणूक प्रोत्साहन,मूलस्थानाबद्दलचे नियम, बौद्धिक संपदा हक्क, TBT/ SPS उपाययोजना, आर्थिक सरकारी आणि अतिमहत्त्वाची खनिजे. सीईपीए वाटाघाटी लवकर आणि कालबद्ध रीतीने पूर्ण होण्यासाठीची एकत्रित वचनबद्धता उभय देशांनी दृढपणे मान्य केली. बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यास अधिक वाव मिळवून देणे, पुरवठा साखळ्यांचा टिकाऊपणा अधिक बळकट करणे, आणि आर्थिक एकात्मीकरण अधिक दृढ करणे- या उद्देशांनी सदर वाटाघाटी सुरु आहेत.

पेरू आणि चिलीबरोबरचे भारताचे वाढते व्यापारी संबन्ध हे लॅटिन अमेरिका प्रदेशाबरोबर अधिक बळकट भागीदारी निर्माण करण्यासाठी धोरणात्मक भर दिला जात असल्याचे प्रतिबिंब होय. परस्परांना फायदेशीर पद्धतीने आणि सर्वंकष आर्थिक सहकार्याच्या आराखड्याच्या माध्यमातून हे साध्य केले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande