
नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर (हिं.स.) - १४ नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी मोहम्मद शमीचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. बीसीसीआयने कसोटी संघ आणि भारत अ संघाची घोषणा केली. दोन्ही संघातून या वेगवान गोलंदाजाचे नाव वगळण्यात आले. २०२३ च्या विश्वचषक आणि २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संयुक्तपणे सर्वाधिक विकेट्स घेणारा शमी मार्च २०२५ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. पण तेव्हापासून तो भारतीय जर्सीमध्ये खेळताना दिसला नाही. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. दक्षिण आफ्रिका मालिकेतून त्याला वगळल्याबद्दल आता त्याची क्रिकेट कारकिर्दीचं संपुष्टात आली असल्याची चर्चा भारतीय क्रिेकेट वर्तुळात सुरु झाली आहे.
मोहम्मद शमी काही काळापासून नियमितपणे देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. बंगालसाठी त्याने गेल्या तीन रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करूनही, त्याला पुन्हा एकदा कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. त्याने बंगालला उत्तराखंड आणि गुजरातवर सलग विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. शमीने गेल्या तीन रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये जवळपास ९३ षटके गोलंदाजी केली. आणि १५ पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
निवडकर्त्यांबद्दल शमीने अलिकडेच केलेल्या विधानांचा उलट परिणाम झाला असल्याची चर्चा आहे. निवडकर्त्यांना असे वाटते की, शमीचे कसोटी क्रिकेटच्या कठोरतेचा सामना करू शकेल की, नाही याची खात्री नाही. कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी दीर्घ सरावाची आवश्यक असते. स्थानिक क्रिकेटमध्येही शमी अनेकदा प्रभावी सरावानंतर विश्रांती घेतो. त्यामुळे त्याच्या फटनेसवर अजूनही प्रश्नचिन्ही कायम आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेनंतर भारत किमान सहा महिने कसोटी क्रिकेट खेळणार नाही. त्यामुळेच मोहम्मद शमीसाठी भारतीय संघाचे दरवाजे बंद झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे