
सोलापूर, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। मी एवढेच केले हसलो मनाप्रमाणे, रडलो मनाप्रमाणे, जगलो मनाप्रमाणे, कवितेत जन्म झाला कवीतेत अंत झाला. या व अन्य कविता सादर करीत सोबतीचा करार या कार्यक्रमातून गायक दत्तप्रसाद रानडे आणि कवी वैभव जोशी यांनी तीन दिवसीय गझल महोत्सवाचा समारोप केला.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात तीन दिवशीय गझल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सोलापूरचे सुपुत्र कवी वैभव जोशी यांनी आपल्या कविता सादर करताना कवीचे आयुष्य सोपे असते असे सांगून शब्द माझा कबीर झाला. ही कविता त्याच बरोबर प्रेमी युगलांवरील अनेक कविताही त्यांनी सादर केल्या. खरे हसणे कुठे गेले ऋतुचा हात धरूनी आपले फुलणे कुठे गेले जुन्या फोटोत दिसणारे खरे असणे कुठे गेले स्वतःचा वाटणारा चेहरा हा चेहरा नाही अरे या आरशातील कालचे असणे कुठे गेले ही कविता सादर केल्यानंतर रसिक श्रोत्यांनी चांगलीच दाद दिली. तर गायक दत्तप्रसाद रानडे यांनी हसलो मनाप्रमाणे, काय सांगायचे, तू धुक्यासारखी मी उन्हासारखा, आठवण., शेवटी काही, आई, धीरे धीरे, मोजकी उन्हे, गझल एैकून ती म्हणते, त्या क्षणी, शेवटी शेवटी आणि विठ्ठल ही गीते सादर करून सभागृहात महौल तयार केला. या कवी आणि गायकांच्या सोबतीच्या करार या कार्यक्रमासाठी संगित दिग्दर्शन आशिष मुजुमदार यांनी केले तर हार्मोनियमवर निनाद सोलापूरकर, गिटार मिलिंद शेवारे, तबला समीर शिवगार, ढोलक अमोद कुलकर्णी यांनी साथ संगत केली तर या कार्यक्रमाचे निर्माते शैलेश नांदुरकर होते.
प्रारंभी राज्यगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली त्यानंतर ज्येष्ठ मराठी हिंदी कलावंत भारतीताई आचरेकर यांचा रंगभूमी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाचे सहदेव खैरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत वेदपाठक यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे समन्वयक अमोल धाबळे यांनी केले. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि संचालक विभिषण चवरे यांच्या प्रयत्नातून हा तीन दिवशीय गझल महोत्सव सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडला. पहिल्या दिवशी अक्षर अक्षर तुझेच आहे आणि गझल रंग हा कार्यक्रम अपूर्व राजपूत, अविनाश काठवटे, सारंग पांपटवार आणि नैनेश तांबे यांनी सादर केले. तर संगीत संयोजन राग आणि प्रकाश योजना ईशान- गार्गी यांनी केले. दुसर्या दिवशी गझल नवाज भीमराव पांचाळे आणि त्यांची कन्या डॉ. भाग्यश्री पांचाळे- गायकवाड यांनी गझल सादर करून रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवली आणि या कार्यक्रमाचा समारोप कवी वैभव जोशी आणि गायक दत्तप्रसाद रानडे यांनी केला. तीनही दिवसामध्ये रसिक श्रोत्यांनी या गझल महोत्सवाला मोठी गर्दी केली होती. या तीन दिवशीय गझल महोत्सवाचे नेटके आयोजन आणि रंगमंचावरील सजावट समन्वयक अमोल धाबळे यांनी केले. या तीन दिवसातील गझल महोत्सवाला सांस्कृतिक विभागाच्या अधिक्षक जानव्ही जानकर, उद्योगपती दत्ताआण्णा सुरवसे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड