
मुंबई, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)। प्रिन्सिपल एल. एन. वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च (WeSchool) येथे “Navigating Leadership in a Fragmented World: From Tokyo to Silicon Valley to the Middle East” या विषयावर विशेष सत्र आयोजित करण्यात आलं होतं. या सत्रात जपानमधील हिरोआकी कुवाजिमा, मॅनेजिंग डायरेक्टर, K & Associates आणि हस बिझनेस स्कूल, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (बर्कले) चे एक्झिक्युटिव्ह फेलो तसेच आयझनहॉवर फेलो (२०१४) यांनी जागतिक नेतृत्वाच्या नव्या दिशांवर प्रेरणादायी विचार मांडले.
या सत्रात डॉ. रमण माधोक, मॅनेजिंग डायरेक्टर, कहानी डिझाईनवर्क्स प्रा. लि. (माजी एमडी आणि सीईओ, JSW लि.) तसेच आयझनहॉवर फेलो (२००४) आणि डॉ. संगीता मधू, डायरेक्टर, ग्लोबल लीडरशिप, आयझनहॉवर फेलो (२०१७) यांचा सहभाग होता. तिन्ही मान्यवरांनी विद्यार्थ्यांसोबत जागतिक विचार, संस्कृती आणि नेतृत्वातील मानवी दृष्टिकोन यावर अर्थपूर्ण चर्चा केली. आपल्या भाषणात हिरोआकी कुवाजिमा म्हणाले, “आपण अशा काळात जगतो आहोत जिथे समाज, तंत्रज्ञान आणि संस्कृती यात विभाग निर्माण झाले आहेत. पण या विभागांमध्येच नेतृत्वाची खरी संधी आहे. खरे नेते ते नसतात जे आदेश देतात, तर ते असतात जे लोकांना जोडतात, समजून घेतात आणि एकत्र आणतात. खरं नेतृत्व आत्मजाणीवेपासून सुरू होतं आणि संस्कृती समजून घेण्याच्या धैर्याने पुढे जातं.”टोकियो, सिलिकॉन व्हॅली आणि मिडल ईस्ट येथील अनुभवांवरून कुवाजिमा यांनी सांगितलं की आत्मजाणीव आणि संस्कृतीची जाण ही प्रभावी नेतृत्वाची गुरुकिल्ली आहे. मिडल ईस्टमधील वाढत्या गुंतवणुकीच्या आणि करिअरच्या संधींबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. एआय, नैतिकता आणि मानवकेंद्री नेतृत्व यांचं संतुलन भविष्यातील नेतृत्वासाठी किती महत्त्वाचं आहे, हे त्यांनी अधोरेखित केलं.
डॉ. रमण माधोक यांनी सांगितलं की उद्देशपूर्ण आणि मूल्याधारित नेतृत्वामुळे संस्थांना खरा बळकटी मिळते. ते म्हणाले,“खरं यश हे केवळ वाढीत नाही, तर नैतिकतेने आणि संवेदनशीलतेने टिकून राहण्यात आहे.”प्रो. डॉ. उदय सालुंखे, ग्रुप डायरेक्टर, वीस्कूल यांनी पाहुण्यांचं स्वागत करताना सांगितलं, “वी स्कूलचं ध्येय नेहमीच जागतिक विचारसरणी असलेले आणि संवेदनशील नेते घडवण्याचं राहिलं आहे. आजचं नेतृत्व फक्त स्ट्रॅटेजी किंवा सिस्टीमवर आधारित नाही, तर ते मानवतेचं आणि भावनिक बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे.” वी स्कूल ही देशातील अग्रगण्य बिझनेस स्कूलपैकी एक असून, डिझाईन थिंकिंग, उद्योगनिष्ठ शिक्षण आणि ग्लोबल लीडरशिप या मूल्यांवर आधारित आहे. ‘ग्लोबल सिव्हिल लीडरशिप’सारख्या उपक्रमांद्वारे संस्था विद्यार्थ्यांना भविष्यातील नेतृत्वासाठी तयार करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर