
७ नोव्हेंबर हा भारतीय सामाजिक इतिहासात एका महत्त्वपूर्ण स्मरणदिनी म्हणून आपल्याला परिचित आहे. हा दिवस केवळ दिनदर्शिकेतील एक तारीख नाही, तर स्वाभिमान, समता, शिक्षण आणि मानवी प्रतिष्ठेच्या संघर्षाची एक निर्णायक सुरुवात दर्शविणारा दिवस आहे. सन १९०० रोजी या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रथमच सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूल या शाळेत दाखल झाले. परंतु हा केवळ एखाद्या व्यक्तीचा शाळेत प्रवेश नसून, भारतीय समाजातील अस्पृश्यतेच्या भिंतींना हादरा देणारा आणि ‘शिक्षण हेच मुक्तीचे शस्त्र’ अशी घोषणा करणाऱ्या एका ऐतिहासिक परिवर्तनाचा प्रारंभ होता. म्हणूनच, या दिवसाचे ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरे होणे हे शिक्षणाचे महत्व, त्यातील मूल्ये, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यातील भूमिका आणि समाजातील बदलाच्या प्रक्रियेसाठी शिक्षण किती अपरिहार्य आहे, हे अधोरेखित करणारे आहे.
भारतीय समाजाची रचना दीर्घकाळापासून असमानता, वर्णव्यवस्था आणि सामाजिक स्तरभेद यांच्या आधारे झालेली होती. शिक्षण हे ज्ञानाचे साधन असून, ज्ञान हेच व्यक्तीचे सशक्तीकरण करणारे सर्वात प्रभावी साधन आहे, याची जाण ज्यांच्या हाती होती त्यांनी शिक्षणावर नियंत्रण ठेवून समाजातील दुर्बल, वंचित आणि दबलेल्यांना ज्ञानापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले. या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळाप्रवेश हा एक सामाजिक क्रांतीचा अंकुर होता. हा दिवस केवळ स्मरणाचा दिवस नाही, तर विद्यार्थी या संकल्पनेचा सामाजिक अर्थ पुन्हा ठरविण्याचा, विद्यार्थ्याच्या अस्तित्वाचा गौरव करण्याचा आणि शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे मूलभूत साधन म्हणून पुन्हा अधोरेखित करण्याचा दिवस आहे.
विद्यार्थी दिन साजरा करण्यामागील मूलभूत उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये स्वतःबद्दलची जागरूकता, सामाजिक जबाबदारी, मूल्याधिष्ठित जीवनदृष्टी, आणि ज्ञानाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची प्रेरणा निर्माण करणे. शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी मिळविणे किंवा आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे एवढाच मर्यादित नाही. शिक्षण व्यक्तीला विचारस्वातंत्र्य, विवेकबुद्धी, आत्मभान आणि सामाजिक न्यायासाठी लढण्याची ताकद प्रदान करते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व आत्मसात केले आणि आपल्या संपूर्ण जीवनातून शिक्षण, संघटना आणि संघर्ष या तीन तत्त्वांवर समाजाला चलनवलन देणारी प्रेरणा दिली. विद्यार्थी हा समाजाचा पाया आहे. पायाच जर मजबूत असेल तर संपूर्ण संरचना स्थिर व सक्षम राहते. म्हणूनच विद्यार्थ्यांनी समाज, इतिहास, संस्कृती, राजकारण, अर्थव्यवस्था आणि मानवी मूल्ये याविषयी जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे.
सध्याच्या काळात विद्यार्थ्यांपुढे अनेक आव्हाने आहेत. जागतिकीकरण, तंत्रज्ञानातील प्रगती, स्पर्धावृत्ती, बेरोजगारी, मानवी मूल्यांची घट आणि मानसिक आरोग्यावर वाढता ताण ही काही प्रमुख आव्हाने म्हणता येतील. परंतु, विद्यार्थी म्हणजेच परिवर्तनाची शक्ती असून तो परिस्थिती बदलविण्याची क्षमता बाळगून असतो. इतिहास साक्षीदार आहे की, सर्वांत मोठ्या क्रांती, आंदोलनं आणि सामाजिक चळवळी विद्यार्थी वर्गाच्या सहभागामुळेच उभ्या राहिल्या आहेत. स्वातंत्र्यलढ्यात असो, आपत्ती व्यवस्थापनात असो किंवा समाज सुधार चळवळीत असो विद्यार्थ्यांनी नेहमीच पुढे राहून समाजाला योग्य दिशा दिली आहे.
या पार्श्वभूमीवर ‘विद्यार्थी दिन’ साजरा करणे म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या ओळखीची, कर्तव्याची आणि सामर्थ्याची जाणीव करून देणे होय. विद्यार्थी हे सामाजिक परिवर्तनाचे वाहक आहेत. त्यांच्यातील विचारांची उंची, दृष्टिकोनाची व्यापकता आणि मनोवृत्तीची सकारात्मकता समाजाला नवीन दिशादर्शन करू शकते. म्हणूनच शिक्षणसंस्था, कुटुंब, समाज आणि शासन या सर्व आघाड्यांवर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वातावरण निर्माण केले पाहिजे. शिक्षण हे मूल्याधिष्ठित, मानवतावादी आणि न्यायनिष्ठ बनले पाहिजे.
आपल्या देशात अजूनही अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहेत. ग्रामीण भागात, आदिवासी समाजात, कुपोषण, गरीबी, मुलींच्या शिक्षणातील अडथळे, बालमजुरी, अपुरी शैक्षणिक साधने, आणि डिजिटल दरी ही शिक्षणापुढील गंभीर आव्हाने आहेत. या समस्यांच्या मुळाशी सामाजिक असमानता, विषमता आणि आर्थिक दुर्बलता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला समाजातील विषमता दूर करण्याचे सर्वात प्रभावी साधन मानले. म्हणूनच विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने आपण शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध, समान, गुणवत्तापूर्ण आणि मूल्याधिष्ठित करण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे.
विद्यार्थी हा केवळ पुस्तकांचा अभ्यास करणारा घटक नाही. विद्यार्थी म्हणजे ज्याच्यात प्रश्न विचारण्याची क्षमता आहे. प्रश्न विचारणे म्हणजेच विचारप्रक्रियेची सुरुवात होय. विचार करण्याची क्षमता हा मानवी संस्कृतीचा पाया आहे. मनुष्यामध्ये इतर प्राण्यांपेक्षा वेगळे काय असते तर ते म्हणजे विचार करण्याची आणि विश्लेषण करण्याची क्षमता. त्यामुळे विद्यार्थी दिन हा प्रश्न विचारण्याचा, संशोधन करण्याचा, जिज्ञासा जागविण्याचा दिवस आहे.
सध्याच्या काळात काही ठिकाणी शिक्षणाचे व्यापारीकरण होताना दिसते. ज्ञान हे विक्रीच्या वस्तूसारखे मांडण्याची प्रवृत्ती वाढताना जाणवते. अशा परिस्थितीत विद्यार्थी दिन आपल्याला शिक्षणातील मूल्यांची आठवण करून देतो. शिक्षण हे समाजातील प्रत्येक घटकाचे मूलभूत हक्क आहे. शिक्षणाचे उद्दिष्ट समाजाला नैतिक, संवेदनशील, सक्रिय आणि प्रगतिशील बनविणे हे आहे. ज्ञानाचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी तर करायचाच आहे, पण त्याचबरोबर समाजातील दुर्बल, शोषित आणि वंचित घटकांसाठी संवेदनशील होणे हेही विद्यार्थी असण्याचे आवश्यक मूल्य आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना नेहमी सांगितले होते की “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.” या संदेशात विद्यार्थ्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व घडविण्याचे तत्त्व आहे. शिक्षणाने तुम्हाला बौद्धिक सामर्थ्य मिळते, संघटना तुम्हाला सामूहिक ताकद देते आणि संघर्ष तुम्हाला प्रतिकूलतेवर मात करण्याची तयारी करून देतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाकडे केवळ परीक्षा किंवा गुणांच्या दृष्टीने पाहू नये. तर शिक्षण हे समाज बदलण्याचे साधन मानून त्याचा उपयोग व्यापक हितासाठी केला पाहिजे.
आज भारताची युवा पिढी जगातील सर्वांत मोठी आहे. युवा म्हणजेच विद्यार्थी वर्ग. ही संख्या भारतासाठी संधी आहे. ही संधी समाजाच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठी वापरायची की फक्त स्पर्धा, ताण आणि बंदिस्त शिक्षण मॉडेलमध्ये हरवायची, हा निर्णय आज आपणच घ्यायचा आहे. विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून आपण विद्यार्थ्यांना मुक्त, विचारशील, आत्मनिर्भर, समतावादी आणि सर्जनशील बनविण्याची दिशा निश्चित केली पाहिजे.
विद्यार्थ्यांचे शिक्षण हे केवळ वर्गखोल्यांमध्ये होणारे शिक्षण नाही. समाज, निसर्ग, संस्कृती, इतिहास, कलेची परंपरा, लोकजीवन, तांत्रिक प्रगती, लोकशाही मूल्ये, संविधानाचे तत्त्वज्ञान ही सर्व शिक्षणाची पाठशाळा आहेत. विद्यार्थी हे या सर्वांशी संवाद साधू लागला की त्याची दृष्टी व्यापक होते. या दृष्टीतूनच परिवर्तनाची बीजे उगवतात.
शेवटी, विद्यार्थी दिन हा केवळ कार्यक्रम साजरा करण्याचा दिवस नाही. हा चेतनेचा दिवस आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळाप्रवेशापासून सुरू झालेली इतिहासाची वाटचाल आजही आपल्याला समानतेच्या, न्यायाच्या आणि ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाते. आजही अनेकांना शिक्षणाचे दरवाजे पूर्णपणे उघडलेले नाहीत. त्यामुळे हा दिवस नवीन संकल्पांची प्रेरणा देतो. शिक्षण सर्वांसाठी, समान संधी सर्वांसाठी आणि सामाजिक न्याय हा शिक्षणाचा आधार आहे.
विद्यार्थी दिनाच्या या शुभप्रसंगी, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या अंतरात्म्यातील जिज्ञासेला जागे करावे, सामाजिक प्रश्नांना समजून घ्यावे, संवेदनशील मन ठेवावे आणि आपले शिक्षण समाजाच्या भल्यासाठी वापरावे. आपण सर्वांनी मिळून असे समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा की जिथे प्रत्येक बालक, प्रत्येक युवक आणि प्रत्येक विद्यार्थी हे सांगू शकतील की “शिक्षण माझा अधिकार आहे, ज्ञान माझी शक्ती आहे आणि समाज परिवर्तन माझे ध्येय आहे.” याच सत्याची पुनःप्रचीती करून देणारा, ज्ञान, समता आणि प्रगतीचा दीप पेटवणारा ७ नोव्हेंबर हा ‘विद्यार्थी दिन’ सर्वांना प्रेरणादायी ठरो यासाठी सर्वाना हार्दिक शुभेच्छा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन....
डॉ. राजेंद्र बगाटे (समाजशास्त्राचे अभ्यासक) मो. ९९६०१०३५८२, ईमेल - bagate.rajendra5@gmail.com
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी