
अमरावती, 6 नोव्हेंबर (हिं.स.)
शिरजगाव कसबा येथील मांगिया-पानझरी पाणंद रस्त्यावरील एका पडिक जमिनीतून सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सागवान जप्त करण्यात आले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. मात्र, सागवान लपवून ठेवणाऱ्या आरोपीचा शोध अद्याप लागलेला नाही, त्यामुळे अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परतवाडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एच. वाळके यांना मांगिया-पानझरी पाणंद रस्त्यालगतच्या पडिक जमिनीत सागवान लपवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
मांगिया गावाबाहेर, मांगिया ते पानझरी पांधन रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या पडिक जमिनीवर हे सागवान लपवून ठेवलेले आढळले. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये सागवानच्या १३ नगांचा समावेश आहे, ज्याचे एकूण घनमीटर ०.४१४ असून त्याची अंदाजे किंमत ३९ हजार ४२४ रुपये आहे.
या कारवाईनंतर वन विभागाकडून वनगुन्हा क्रमांक ००१८०/०४४८२ दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी कोणताही आरोपी आढळून न आल्याने, या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास वनपाल व्ही. व्ही. कोवळे करत आहेत.
ही कारवाई उपवनसंरक्षक अर्जुना के. आर. आणि सहायक वनसंरक्षक ज्ञानेश्वर देसाई (कॅम्पा व वन्यजीव, अमरावती) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एच. वाळके, वनपाल व्ही. व्ही. कोवळे, वनरक्षक एस.एन. भगत, वनमजूर बी.जे. चव्हाण आणि रोजंदारी मजूर पराग दातीर यांचा सहभाग होता.दरम्यान, अशा प्रकारचे अवैध प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी