ट्रम्प यांचा पुन्हा एकदा भारत- पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवल्याचा दावा
वॉशिंग्टन , 6 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यात मे महिन्यात जी शांती प्रस्थापित झाली, ती त्यांच्या कठोर इशाऱ्यानंतरच शक्य झाली. ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांन
ट्रम्प यांचा पुन्हा एकदा भारत- पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवल्याचा दावा


वॉशिंग्टन , 6 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यात मे महिन्यात जी शांती प्रस्थापित झाली, ती त्यांच्या कठोर इशाऱ्यानंतरच शक्य झाली. ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांनी दोन्ही देशांना धमकी दिली होती की जर त्यांनी आपापसातील लढाई सुरूच ठेवली, तर अमेरिका त्यांच्या कोणत्याही व्यापार कराराला मान्यता देणार नाही.

मियामी येथे झालेल्या अमेरिका बिझनेस फोरमला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले, “मी दोन्ही देशांसोबत व्यापार कराराच्या प्रक्रियेत होतो. तेव्हाच मी वृत्तपत्रात वाचले की भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू झाले आहे — सात विमाने पाडली गेली आहेत, आणि आठवेही गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाले आहे. म्हणजे एकूण आठ विमाने नष्ट झाली होती. मग मी म्हणालो, ‘जर तुम्ही युद्ध करत असाल, तर मी तुमच्याशी कोणताही व्यापार करणार नाही.’”

ट्रम्प पुढे म्हणाले, “मी दोन्ही देशांना सांगितले, ‘तुम्ही दोघेही अण्वस्त्रधारी देश आहात. जर तुम्ही युद्ध सुरूच ठेवले, तर अमेरिका कोणताही व्यवहार करणार नाही.’ आणि दुसऱ्याच दिवशी मला फोन आला की दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित केली आहे. मग मी म्हणालो, ‘छान! आता व्यापार करा.’”या दरम्यान ट्रम्प यांनी म्हटले, “हे सगळं टॅरिफ्समुळे झालं. जर टॅरिफ्स नसते, तर हे कधीच घडलं नसतं.”

ट्रम्प यांनी 10 मे रोजी सोशल मीडियावर जाहीर केले होते की, दीर्घ चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तान यांनी पूर्ण आणि तत्काळ युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे. मात्र, भारताने वारंवार स्पष्ट केले आहे की, या प्रक्रियेत कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका नव्हती. भारताचा ठाम दावा आहे की सर्व प्रश्न हे द्विपक्षीय आहेत आणि बाह्य मध्यस्थतेची गरज नाही.

भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते, जे पाकिस्तान आणि पाक-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ढाच्यांवर लक्ष्य ठेवून करण्यात आले होते. ही कारवाई 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात होती, ज्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता. सीमापार ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले चार दिवस चालले, आणि 10 मे रोजी दोन्ही देशांनी संघर्षविरामावर सहमती दर्शवली.

आपल्या भाषणादरम्यान ट्रम्प यांनी आणखी दावा केला की त्यांनी “कोसोवो–सर्बिया, काँगो–रवांडा, इस्रायल–इराण, इजिप्त–इथिओपिया, आर्मेनिया–अझरबैजान आणि कंबोडिया–थायलंड” यांच्यातील जुने युद्धही संपवले. ते म्हणाले, “काही युद्धे 32 वर्षांपासून चालू होती, काही 38 वर्षांपासून. मी त्यापैकी अनेक वाद एक तासात सोडवले तेही संयुक्त राष्ट्रांच्या मदतीशिवाय.”

ट्रम्प म्हणाले, “अमेरिका शक्तीच्या माध्यमातून शांती आणत आहे. आता कोणताही देश आमच्याशी पंगा घ्यायला तयार नाही.” त्यांनी चीन, जपान आणि मलेशिया यांच्यासोबत झालेले अलीकडील व्यापार करारांचाही उल्लेख केला आणि म्हटले की हे सर्व देशांसाठी फायदेशीर आर्थिक करार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande