
ढाका, 6 नोव्हेंबर (हिं.स.) - बांगलादेशमध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचार मोहिमेला सुरुवात होताच देशाच्या विविध भागांत हिंसाचार भडकला आहे. या दरम्यान चिटगावमध्ये विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) चे उमेदवार एरशाद उल्लाह यांना गोळी लागून ते जखमी झाले आहेत, तर कुमिल्ला जिल्ह्यात दंगेखोरांनी एका दुसऱ्या उमेदवाराच्या घराला आग लावली.
अंतरिम सरकारने या घटनांची तीव्र निंदा केली असून म्हटले आहे की, लोकशाही प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचा हिंसाचार सहन केला जाणार नाही. सरकारने सांगितले की प्राथमिक चौकशीत असे दिसून आले आहे की बीएनपी उमेदवार एरशाद उल्लाह हे हल्ल्याचे मुख्य लक्ष्य नव्हते, तर ते चुकून लागलेल्या गोळीमुळे जखमी झाले.
सरकारने निवेदनात म्हटले आहे, “या गुन्हेगारी घटनेबद्दल आम्ही तीव्र चिंता व्यक्त करतो आणि सर्व उमेदवार व नागरिकांच्या सुरक्षेची हमी देण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. चिटगाव महानगर पोलिसांना (सीएमपी) कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडले जाईल.”मुख्य सल्लागारांनी सुरक्षा यंत्रणांना आदेश दिले आहेत की दोषींना कोणत्याही परिस्थितीत अटक करून न्यायालयीन कारवाईच्या कक्षेत आणावे. त्यांनी म्हटले, “हिंसा आणि धमकावण्याची राजकारण बांगलादेशच्या सामाजिक व राजकीय संस्कृतीत कोणत्याही प्रकारे ग्राह्य नाही.”
सरकारने सर्व राजकीय पक्ष आणि त्यांच्या समर्थकांना आवाहन केले आहे की, त्यांनी शांतता राखावी आणि निवडणूक प्रक्रिया सन्मानजनक व शांततामय ठेवावी. निवेदनात पुढे म्हटले आहे, “सरकार हे सुनिश्चित करेल की फेब्रुवारीतील सार्वत्रिक निवडणुका स्वतंत्र, निष्पक्ष, विश्वासार्ह आणि उत्सवी वातावरणात पार पडतील.”
दरम्यान, बीएनपीने जमात-ए-इस्लामीवर निवडणूकपूर्व वातावरण बिघडवण्याचा आरोप केला आहे.पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, जमात समर्थित विद्यार्थी संघटनांनी अलीकडेच विद्यापीठ विद्यार्थी संघ निवडणुकांमध्ये मिळवलेल्या विजयांनंतर देशात अस्थिरता वाढली आहे.बीएनपी उमेदवार अनवारुल हक म्हणाले, “जमात-ए-इस्लामी आणि काही सरकारी सल्लागार मिळून देशाचे वातावरण खराब करत आहेत. काही परदेशी शक्तीही यात सहभागी असू शकतात. आपल्या देशातील लोक धार्मिक आहेत, पण ते अतिरेकवादाच्या विरोधात आहेत.” कुमिल्ला जिल्ह्यातील बीएनपी उमेदवार मोनोवार सरकार यांनी आरोप केला की त्यांच्या घराला अज्ञात लोकांनी आग लावली. ते म्हणाले, “दंगेखोरांनी माझ्या घरातील अनेक वस्तू जाळून टाकल्या. हे स्पष्ट संकेत आहेत की विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode