
रायगड, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना, माणगावात पुन्हा एकदा अशाच प्रकारची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अनोळखी व्यक्तीने स्वतःला स्टेट बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून एका नागरिकाला योनो बँकिंग ऍपच्या नावाखाली तब्बल ₹1,90,000 रुपयांची फसवणूक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहणार नितीश अपार्टमेंट, विंग एफ, खोली क्रमांक 2, कचेरी रोड, माणगाव हे कोकण रेल्वे माणगाव टेक्निशियन म्हणून कार्यरत आहेत. दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता त्यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला. “मी स्टेट बँकेतून बोलतोय, तुम्हाला योनो बँकिंग ऍप घ्यायचे आहे का? जर घेतले नाही, तर तुमचे बँक खाते बंद होईल,” असे सांगत आरोपीने त्यांना फसवले.यानंतर त्या व्यक्तीने व्हॉट्स ऍपवर स्कॅनर कोड पाठवला तसेच फिर्यादीचा एसबीआय बँक खाते क्रमांक विचारून घेतला. काही वेळातच फिर्यादीच्या खात्यातील ₹1,90,000 रुपये काढून घेतले गेले. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच फिर्यादीने तत्काळ माणगाव पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवली.या प्रकरणी गुन्हा क्रमांक 264/2025 नोंद करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 (2008 सुधारणा) कलम 66(c) आणि भारतीय न्याय संहिता कलम 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.पोलीसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या कॉल्स, लिंक किंवा क्यूआर- कोडवर विश्वास न ठेवण्याचे आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या बँक खात्याची माहिती शेअर न करण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके