
गडचिरोली, 7 नोव्हेंबर (हिं.स.) | गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या निर्देशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आलापल्ली (ता. अहेरी) येथे सापळा रचून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यशस्वी मोहीम राबवली. या कारवाईत देशी-विदेशी दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण ८,६९,४००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, काही व्यक्ती चारचाकी वाहन क्रमांक MH २० EJ ५२७२ मधून अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक करणार आहेत. या माहितीनुसार, पथकाने ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी सावरकर चौक, आलापल्ली येथे सापळा रचला. भरधाव वेगाने येणारे संशयित वाहन पोलिसांनी थांबवून तपासणी केली असता, वाहनात मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा आढळला.
जप्त केलेला दारूसाठा:
संत्रा देशी दारूचे ३१ बॉक्स (किंमत: ₹२,४८,०००/-)
रॉयल स्टॅग व्हिस्कीचे ०७ बॉक्स (किंमत: ₹१,४७,०००/-)
हेवर्ड बियरचे १४ बॉक्स (किंमत: ₹१,००,८००/-)
ऑफिसर चॉईस व्हिस्कीच्या ०२ पेट्या (किंमत: ₹४२,०००/-)
ट्यूबर्ग बियरचे ०३ बॉक्स (किंमत: ₹२१,६००/-)
या दारूसाठ्यासोबत वाहतुकीसाठी वापरलेले चारचाकी वाहन (किंमत: ₹३,००,०००/-) आणि एक मोबाईल (किंमत: ₹१०,०००/-) असा एकूण ₹८,६९,४००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी आणि गुन्हा:
चालकाची चौकशी केली असता, त्याने चंद्रपूर येथील पंकज अशोक शर्मा आणि सुलतान शेख यांनी आलापल्ली येथील किशोर डांगरे व पप्पी झोरे यांच्या सांगण्यावरून ही वाहतूक केल्याची कबुली दिली.
याप्रकरणी पोस्टे अहेरी येथे कलम ६५ (अ), ९८ (२), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वाहन चालक पंकज शर्मा याला अटक करण्यात आली असून, त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अहेरी यांच्यासमोर हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. देवेंद्र पटले करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, सत्य साई कार्तिक, गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात स.पो.नि. भगतसिंग दुलत आणि पोशि दिपक लोणारे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond