
जळगाव, 7 नोव्हेंबर, (हिं.स.) - जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिस दलाकडून विशेष ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबविण्यात आले. जिल्हाभर झालेल्या या मोठ्या मोहिमेत तब्बल २६९ पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. चार तासांच्या या कारवाईदरम्यान विविध गुन्हे, तपासण्या व नियमभंगांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या. या मोहिमेत एकूण २,४५८ वाहनांची तपासणी करण्यात आली, तर ८२ तडीपार आरोपींची चौकशी करण्यात आली.
दारूबंदी कायद्यांतर्गत ९०, जुगार कायद्यान्वये ३४ आणि शस्त्र कायद्यान्वये १ गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये २२ गुन्हे दाखल झाले. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अंतर्गत १४ केसेस नोंदविण्यात आल्या असून, एकूण १४८ वॉरंट बजावण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यातील १३५ हॉटेल्स व लॉजेसची तपासणी करण्यात आली. मोटार वाहन कायद्यान्वये ६७१ प्रकरणांवर कारवाई करून पोलिसांनी एकूण ₹५ लाख १० हजार ३५० रुपयांचा दंड वसूल केला.जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या कारवाया गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढील काळातही सातत्याने राबविण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर