
रत्नागिरी, 9 नोव्हेंबर, (हिं. स.) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी रत्नागिरीतीली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात सोमवारपासून (दि. १० नोव्हेंबर) सुरू होत आहे.
स्पर्धेत सोमवारपासून ९ डिसेंबरपर्यंत रोज संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांच्या हस्ते तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे कार्यवाह वामन कदम, बालरंगभूमी परिषद शाखा रत्नागिरी कार्यवाह सौ. सीमा कदम, ज्येष्ठ रंगकर्मी दत्ता बोरकर आणि रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य राजेश गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केले आहे.
स्पर्धेमध्ये एकूण १८ संघांचा सहभाग असून उद्घाटनानंतर दर्यावर्दी प्रतिष्ठान निर्मित अकल्पित नाटकाने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा, असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी