
रायगड, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। ओळखीचा फायदा घेत अलिबागमधील प्रसिद्ध म्हात्रे ज्वेलर्सला तब्बल 27 लाख 73 हजार रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन महिला आणि एका पुरुषाविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींपैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश सूर्यगंध, सायली भोईर आणि प्रतिभा सूर्यगंध अशी आरोपींची नावे असून, यातील ऋषिकेश हा सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे, तर इतर दोघे उरण परिसरातील आहेत. हे तिघे विवाहासाठी दागिने खरेदीच्या बहाण्याने म्हात्रे ज्वेलर्सच्या दुकानात आले. जुन्या ओळखीचा फायदा घेत ऋषिकेशने “लग्नासाठी काही दागिने पसंतीसाठी घरी नेऊ” असे सांगून सोन्याचे दागिने घेतले.
दुकानदाराने विश्वास ठेवून दागिने दिल्यानंतर अनेक दिवस उलटले, तरीही दागिने परत करण्यात आले नाहीत. संशय आल्याने ज्वेलर्सने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तपासाअंती 27 लाख 73 हजार रुपयांच्या फसवणुकीचा प्रकार समोर आला. अलिबाग पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपी ऋषिकेश सूर्यगंधला अटक केली असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक चौकशीत आरोपींनी “रसिका” नावाच्या आणखी एका महिलेला हे दागिने दिल्याची कबुली दिली आहे.
या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली आहेत. या घटनेमुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी ज्वेलरी व्यवसायिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके