लातूर मध्ये फिर्यादीच निघाला आरोपी
लातूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। चोरट्यांनी गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन खेचून चोरुन नेल्याची तक्रार एकाने एमआयडीसी येथील पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानूसार अज्ञात चोराविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. परंतु, पोलिसांच्या तपासात फिर्यादीच आ
चेन फिर्यादीच्या पत्नीस परत करण्यात आली


लातूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। चोरट्यांनी गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन खेचून चोरुन नेल्याची तक्रार एकाने एमआयडीसी येथील पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानूसार अज्ञात चोराविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. परंतु, पोलिसांच्या तपासात फिर्यादीच आरोपी निघाला असून या खोट्या तक्रारीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

फिर्यादी भानुदास मुकुंदराव बिरादार (वय ६० वर्षे), व्यवसायाने सेवानिवृत्त शिक्षक, रा. कोर्ट कॉलनी, पठाणवाडी, लातूर, यांनी येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, अनोळखी इसमांनी त्यांच्या घरी येऊन त्यांना बाहेर बोलावले व त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांची सोन्याची चेन खेचून चोरून नेली, तसेच तिसरा साथीदार रिक्षामधून तिथून पळून गेला. फिर्यादीच्या या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी तीन इसमांविरुद्ध चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेची गांभीर्याची दखल घेत तपास पथकाची तात्काळ स्थापना करण्यात आली. तपासादरम्यान बारकाईने टेक्निकल व गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती मिळवून मिळालेल्या माहितीचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले मात्र, फिर्यादीने सांगितलेल्या वेळेत आणि ठिकाणी कोणतीही चेन स्नॅचिंगची घटना आढळून आली नाही. इलेक्ट्रॉनिक पुरावे व इतर तांत्रिक पुरावे तपासले असता, गुन्हा घडल्याचा कोणताही ठोस पुरावा आढळून आला नाही. स्थानिक गुप्त माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा काही लोकांसोबत वैयक्तिक वाद असल्याचे समोर आले. त्या वादातील व्यक्तींना अडकवण्यासाठी त्यांनी जाणूनबुजून खोटी फिर्याद दिली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

तपासादरम्यान पोलीसांनी फिर्यादीकडून चौकशी केल्यावर सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केली. मात्र, तांत्रिक पुरावे समोर ठेवल्यानंतर त्यांनी शेवटी गुन्हा खोटा असल्याची कबुली दिली. तपासादरम्यान फिर्यादीकडून सदर सोन्याची चेन जप्त करून, पडताळणी केली असता ती फिर्यादीच्या मालकीचीच असल्याचे सिद्ध झाले. यानंतर सदर चेन फिर्यादीच्या पत्नीस परत करण्यात आली आहे. खोटी तक्रार देऊन पोलीस प्रशासनास दिशाभूल केल्याबद्दल फिर्यादी भानुदास मुकुंदराव बिरादार यांच्या विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande